Paaru Serial Promo : ‘पारू’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या या मालिकेत अहिल्या देवींनी त्यांचा मुलगा आदित्य व पारू यांना घराबाहेर काढलेलं असून हे दोघे आता किर्लोस्कर कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. अशातच आता मालिकेत पारूला जेवण बनवण्याचं काम मिळाल्याचं पाहायला मिळतं.
अहिल्याने घराबाहेर काढल्यानंतर आदित्य व पारू एका चाळीत राहत असतात, तर पारूला नुकतंच जेवण बनवण्याचं काम मिळालं असतं. पण, आता यामुळे पारू व आदित्य अहिल्यादेवीसमोर येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळतं. ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.
पारूला जिथे जेवण बनवण्याचं काम मिळालेलं असतं तिथेच अहिल्यादेवी व किर्लोस्कर कुटुंबाला जेवणाचं आमंत्रण असतं. पारूने सगळं जेवण बनवलेलं असतं; पण येणारे पाहुणे अहिल्यादेवी आणि किर्लोस्कर कुटुंबीय आहेत याबद्दल तिला माहिती नसते. म्हणून ती मास्क घालून सगळ्यांसमोर वावरते आणि अहिल्या व किर्लोस्कर कुटुंबीयातील कोणालाही ती पारूच आहे याबद्दल माहित नसतं. पारूने बनवलेलं जेवण अहिल्या यांना खूप आवडतं आणि त्या तिला बक्षीस म्हणून हातातील सोन्याची बांगडी देताना मालिकेत पाहायला मिळालं.
अहिल्यासमोर येणार पारू व अदित्य
अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये अहिल्या यांना जेवण आवडल्यानंतर त्या पारूचं कौतुक करत तिला मास्क काढून तिचा चेहरा दाखवायला सांगतात. पुढे पारूच्या चेहऱ्यावरील मास्क काढल्यानंतर सगळ्यांना तिला तिथे पाहून धक्का बसतो आणि अहिल्या रागावलेल्या दिसतात. पुढे पारूचा चेहरा पाहिल्यानंतर ज्यांनी किर्लोस्कर कुटुंबाला जेवणाचं आमंत्रण दिलेलं असतं त्या बाई अहिल्या यांना “अहिल्या, ही तुझ्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर आहे न” असं म्हणतात. त्यावर आहिल्या “होती, तिच्याशी आता आमचा काहीही संबंध नाही,” असं म्हणताना दिसतात.
प्रोमोमध्ये पुढे दुसरीकडे आदित्य तिथे बुकेची डिलीव्हिरी करण्यासाठी येतो. परंतु, तिथे त्याचा अपमान होतो, त्याला धक्का बुक्की केली जाते, तेव्हा तिथे अहिल्या येतात आणि आदित्य त्यांना आई अशी हाक मारताना दिसतो. आदित्यची अशी अवस्था पाहून अहिल्या यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला दिसतो, त्यामुळे आता पारू व आदित्य एकत्र अहिल्यासमोर आल्यानंतर अहिल्या देवी नेमकं काय करणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.