Zee Marathi Paaru & Aditya Dream Proposal Promo : साधीभोळी ‘पारू’ किर्लोस्करांकडे मदतनीस म्हणून कामाला लागते. हळुहळू सगळ्या अडचणींमध्ये किर्लोस्करांना मदत करते आणि तिच्या चांगल्या स्वभावामुळे अल्पावधीतच तिच्या देवीआईंचं मन जिंकून घेते. पण, ‘पारू’ अहिल्यादेवींसाठी कितीही चांगली असली तरीही, अहिल्यादेवी तिचा सूनबाई म्हणून स्वीकार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते मालिकेत तो क्षण अखेरिस येणार आहे…

अहिल्यादेवींचा लाडका आदित्य ‘पारू’समोर प्रेमभावना व्यक्त करून तिला प्रपोज करणार आहे. ‘पारू’चं तिच्या आदित्य सरांवर जीवापाड प्रेम असतं. पण, आदित्य आपल्या भावना पारूसमोर कधी व्यक्त करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. कंपनीच्या लोगोवरचे डोळे ‘पारू’चे आहेत…आपण एवढे दिवस ज्या मुलीच्या शोधात होतो ती मुलगी ‘पारू’ आहे, हे सत्य जेव्हा आदित्यला कळतं तेव्हापासून दोघांमधलं प्रेम हळुहळू बहरत जात असल्याचं पाहायला मिळत होतं.

आदित्यचं ‘पारू’साठी ड्रीम प्रपोजल…

‘पारू’ अगदी परीसारखा सुंदर भरजरी ड्रेस घालून आदित्यबरोबर बाहेर जाते. आदित्य तिला गाडीतून उतरवतो आणि तिच्या डोळ्याला पट्टी बांधतो. “सर, आपण इथे कुठे आलोय आपण…माझ्या डोळ्यावर पट्टी का बांधताय” असं पारू आदित्यला विचारते. आदित्य तिला हळुहळू पुढे घेऊ जातो अन् डोळ्यावरची पट्टी काढतो…यानंतर मालिकेच्या प्रोमोमध्ये डोळ्यांचं पारणं फिटणारं दृश्य दिसतं.

तलाव, चंद्राचा मंद प्रकाश, रोषणाई केलेली बोट, फटाक्यांची आतिशबाजी…अशा भव्यदिव्य सेटअपमध्ये आदित्य पारूसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणार आहे.

“या नदीचं निर्मळ पाणी…हे पाणी शुद्ध आहे, पवित्र आहे आणि तितकंच निर्मळ माझं तुझ्यावरचं प्रेम! मला इथून पुढच्या आयुष्याची सुरुवात तुझ्यापासून करायची आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे पारू…! पारू आज हा आदित्य किर्लोस्कर, पूर्ण शुद्धीत, निसर्गाच्या सानिध्यात तुला विचारतोय…पारू माझी होशील का?” असं रोमँटिक मागणं आदित्य पारूला घालतो.

यानंतर जराही विचार न करता पारू म्हणते, “होय आदित्य सर…” आणि अशारितीने दोघांच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग २२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केला जाणार आहे.