Paaru Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य अन् पारूमधील प्रेम बहरत जात असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. रुसलेल्या पारूला आदित्यने पुन्हा एकदा किर्लोस्करांच्या घरी आणलेलं आहे. आपली मैत्रीण पुन्हा घरी आल्यामुळे आदित्य प्रचंड आनंदी असतो. तो पारूला गिफ्ट म्हणून कानातले देतो. हे गिफ्ट पारू स्वीकारते आणि आदित्यला माफ करते. यामुळे मालिका सध्या रंजक वळणावर जाऊन पोहोचली आहे.
आदित्य आणि पारूची जवळीक दामिनीला पहिल्या दिवसापासून खटकत असते. त्यामुळे ती अहिल्यादेवींच्या मनात पारूबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करते. पारू आदित्यने दिलेले नवीन कानातले घालून सर्वत्र मिरवत असते. पारूचे कानातले पाहून दामिनी तिच्यावर चोरीचा आळ घेते. एवढे महागडे कानातले तुझ्याकडे कसे आले याबद्दल दामिनी संशय व्यक्त करते. पण, यावेळी ही साधीभोळी पारू दामिनीचं अजिबात ऐकून न घेता तिला पुरून उरते.
पारू हे कानातले आदित्यने गिफ्ट दिल्याचं दामिनीला सांगते. यामुळे दामिनी रागात निघून जाते. आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. पारू आणि आदित्य देवीच्या पाया पडण्यासाठी जातात. याठिकाणी काही गुंड पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. यानंतर आदित्य त्या गुंडांचा पाठलाग करु लागतो. ‘पारू’ने अडवून सुद्धा आदित्य निघून जातो. काही वेळाने हे गुंड पुन्हा पारूजवळ येतात. ते पारूला हात लावणार इतक्यात ती रौद्ररुप धारण करून आदित्यबद्दल विचारपूस करते याशिवाय मंगळसूत्राबद्दल देखील या गुंडाना विचारते. मालिकेत तिचं पहिल्यांदाच असं रौद्ररुप पाहायला मिळणार आहे.
मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. यापूर्वी सुद्धा आदित्यला अनुष्काने किडनॅप केलं होतं, त्यामुळे “हा आदित्य अजून किती वेळा किडनॅप होणार”, “हा सीन कॉमेडी जास्त वाटतोय”, “आदित्य पुन्हा गायब झाला”, “किती ओव्हर करताय अजब मालिका आहे”, “हे अती होतंय… ही चिंटी केवढी आणि एवढा त्रिशूल हातात घेऊन सीन दाखवलाय”, “ही लहान मुलांची मालिका वाटतेय आता”, “कंटाळा आला ही मालिका पाहून” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग १३ एप्रिल रोजी ( रविवार ) दुपारी १२ आणि संध्याकाली ६:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.