‘पंचायत’ या लोकप्रिय सीरिजच्या चौथ्या सीझनची सध्या ओटीटी विश्वात चांगलीच चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजमधील सगळ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशातच आता या सीरिजमधील एका अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत एक माहिती समोर आली आहे. खरंतर, अभिनेत्याने स्वतःच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे.
‘पाताळ लोक’ आणि ‘पंचायत’ या सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आसिफ खानला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही दिला जाणार आहे.
आसिफने रुग्णालयातून आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत असं म्हटलंय, “आयुष्य खूपच लहान आहे. प्रत्येक दिवस अमूल्य आहे. एका क्षणात सगळं काही बदलू शकतं. त्यामुळे आपल्याकडे जे आहे; त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी कोण महत्त्वाचं आहे ते ओळखा आणि त्यांना कायम जपा. आयुष्य हे एक सुंदर देणं आहे. आपण खूप नशिबवान आहोत.”

आसिफने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या वृत्तात असं म्हटलं, “गेल्या काही तासांपासून मला त्रास होता; ज्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. पण आता माझी प्रकृती सुधारत आहे. सर्वांच्या प्रेम, काळजी आणि शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभार मानतो. मी लवकरच बरा होईन तुमच्या मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज होईन. तोपर्यंत धन्यवाद.”

दरम्यान, आसिफच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पंचायत’ या अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील सीरिजमध्ये त्याने ‘गणेश’ ही भूमिका साकारली होती. तसंच ‘पाताल लोक’च्या पहिल्या सीझनमध्ये आसिफने ‘कबीर एम’ ही भूमिका साकारली होती.
आसिफने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘रेडी’ (२०११) आणि ‘अग्निपथ’ (२०१२) सारख्या चित्रपटांमध्ये एक सहाय्यक कलाकार म्हणून केली होती. याशिवाय त्याने ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ (२०१७), ‘पगलेट’ (२०२१), आणि ‘काकुडा’ (२०२४) या लोकप्रिय चित्रपटांमध्येही काम केले आहे.