Nikitin Dheer Emotional Post after Father Pankaj Dheer Death : ‘महाभारत’ या मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांचं १५ ऑक्टोबर रोजी कर्करोगामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर १० दिवसांनी त्यांचा मुलगा निकितिन धीर यांनी पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमधून निकितिनने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंकज धीर यांचा मुलगा असल्याचा अभिमान आहे, असं निकितिनने म्हटलं आहे.

निकितिन धीरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याच्या वडिलांचे तरुणपणीचे फोटो पाहायला मिळतात. व्हिडीओत निकितिन अस्थी विसर्जनाची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाही.. पण मी प्रयत्न करेन..
असं म्हणतात की जन्मानंतर ज्या गोष्टीची खात्री असते, ती म्हणजे मृत्यू..
आपल्या सर्वांना हे माहित आहे, आपण ते स्वीकारतो, त्यावर विश्वास ठेवतो, पण जेव्हा आपण अशा एखाद्या व्यक्तीला गमावतो जो आपल्या असण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, तेव्हा बरेच प्रश्न पडतात.
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, मी माझे वडील, माझे गुरु, माझे सर्वात चांगले मित्र.. श्री पंकज धीर यांना गमावलं.. काही काळापासून ते बरे नव्हते. त्यांच्या निधनाने आम्हा कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय.

ते गेल्यानंतर आम्हाला हजारो मेसेज आले. तरुणांनी प्रार्थना, मोठ्यांनी आशीर्वाद पाठवले. आणि त्यांचे मित्र, सहकारी आणि भावांनी प्रेम दिलं.. आम्हाला बाबांसाठी इतकं प्रेम आणि आदर मिळाला, जो शब्दांत व्यक्त करता येणार नाही.. आणि मी मेसेजला उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हतो..

त्यांच्या निधनाला काही दिवस झाले आहेत, पण अजूनही त्यांना मिळणारी प्रेमाची अखंड नदी वाहतीये, तेव्हा मला जाणवलं की..आयुष्य म्हणजे भौतिक गोष्टी गोळा करणं नाही..तर प्रेम..आशीर्वाद..आदर सत्कार..हे सर्व आहे..हे सगळं माझे वडील पुढे घेऊन जातील.

आज मला त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान आहे..ते सर्वोत्तम वडील होते.. धाडस काय असतं हे त्यांनी मला शिकवलं.. कॅरेक्टर काय असतं.. निष्ठा काय असते.. चिकाटी काय असते.. एखाद्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करावा, ते शिकवलं. त्यांनी आयुष्यात मला शिकवलेल्या सर्व गोष्टी कायम लक्षात राहतील. त्यांनी माझी म्युझिकशी ओळख करून दिली. त्यांचं सिनेमावरील प्रेम..त्यांच्याकडून मला वारशात मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या इंडस्ट्रीबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर.

पाहा पोस्ट

एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून मी माझ्या वडिलांना अभिमान वाटेल अशाच गोष्टी करेन, असं मी वचन देतो.
तुम्ही दाखवलेल्या आदर आणि प्रेमाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो..
हा व्हिडीओ त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांचं कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आहे.
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून हात जोडून तुम्हा सर्वांचे आभार,” असं निकितिन धीरने पोस्टमध्ये लिहिलंय.