Parag Tyagi Talks About Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांना धक्का बसला. तिला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे २७ जून रोजी तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या घरात तपास करीत असताना ती अँटी एजिंगची औषधं घेत असल्याचं समोर आलेलं. त्यानंतर त्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या. अशातच आता तिचा नवरा अभिनेता पराग त्यागीने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

पत्नी शेफालीच्या निधनानंतर परागनं तिच्या नावानं नुकतंच यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यातील एका व्हिडीओमध्ये त्याने एँटी एजिंग औषधांबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल तो म्हणाला, “ही अर्धवट माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, यामध्ये कोणती औषधं अँटी-एजिंगची होती? शेफाली रोज मल्टिव्हिटॅमिन्स घ्यायला तयार नव्हती. कारण- ती विसरायची, त्यामुळे तिनं महिन्यातून एकदा IV ड्रिपद्वारे घ्यायची. त्यात मल्टिव्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन C, कोलेजन व ग्लुटाथायोन यांचा समावेश होता, जे सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट्सपैकी एक आहे.”

शेफालीनं रिकाम्या पोटी अँटी एजिंग औषधं घेतली होती, असं वृत्त समोर आलेलं. त्याबद्दल पराग म्हणाला, “आम्ही अशा औषधांचं सेवन करतो आणि त्या दिवशी तिनं औषधं घेतलेली. पण, असं काही नाहीये की, त्या दिवशी ती जेवली नव्हती वगैरे. तिनं त्या दिवशी उपवास केला होता; पण पूजा केल्यानंतर ती जेवली होती आणि त्यानतंर ती झोपली. झोपेतून उठल्यानंतर तिनं पुन्हा जेवण केलेलं.”

परागनं पुढे सांगितलं, “लोक कोणत्या अँटी-एजिंग औषधांबद्दल बोलत आहेत? ती तिच्या वयापेक्षा लहान दिसायची. कारण- त्यामागे तिची खूप मेहनत होती. तिनं आहारावर नियंत्रण ठेवलं होतं; पण याचा अर्थ असा नाही की, ती काही खात नव्हती. ती अर्धा किलो आईस्क्रीमचा पॅकही खायची; पण त्यानंतर आम्ही वर्कआऊटही करायचो. आम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा हे खायचो. दर रविवारी ती चायनीज किंवा काहीतरी वेगळं खायची. तिनं कधीच स्वतःला अशा गोष्टींपासून वंचित ठेवलं नाही. मला माहीत नाही की हे उपवासाचं प्रकरण कसं सुरू झालं. असं वाटतं की, कोणीतरी हे बोललं आणि बाकीच्यांनी तेच उचलून धरलं. मी लोकांना विनंती करतो की, आधी सत्य शोधा आणि मग बोला.”

शेफाली जरीवालाबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्रीचं वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं २७ जून रोजी राहत्या घरी निधन झालं. ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते २००२ प्रदर्शित झालेल्या ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे. त्यानंतर काही चित्रपटांत काम केल्यानंतर तिनं नच बलिये, बिग बॉस १३ या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.