Pavitra Punia Engagement Photos : मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींचे लव्ह लाईफही अनेकदा चर्चेत येत असते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान. ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात सहभागी झालेली ही जोडी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागली. मात्र, या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतरच त्यांचा ब्रेकअप झाला.
त्यानंतर आता पवित्रा पुन्हा प्रेमात पडली आहे. त्याबद्दल स्वत: पुनियानंच खुलासा केला आहे. एजाज खानबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आलेली पवित्रा सध्या एका व्यावसायिकाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. दोघंही बराच काळ एकत्र आहेत. त्यावर आता तिनं साखरपुडा करीत शिक्कामोर्तबही केलं आहे. पुनियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करीत तिच्या नव्या प्रेमाबद्दलची जाहीर कबुली दिली आहे.
पवित्रानं तिच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत तिचा प्रियकर गुडघ्यावर बसून तिला अंगठी देत आहे. दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांना मिठी मारत ल्याचेपाहायला मिळत आहेत. एका सुंदर समुद्रकिनारी हा साखरपुडा झाला असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. पवित्रानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा या फोटोंमधून उघड केलेला नाही. तसंच तिनं नावही सांगितलं नाहीय.
साखरपुड्याचे हे सुंदर असे फोटो शेअर करीत पवित्रानं मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “लॉक इन. प्रेमानं हे अधिकृत केलंय”, असं म्हणत पवित्रा पुनिया लवकरच मिसेस होणार असल्याचंही तिनं सांगितलं आहे. तसेच यापुढे तिनं #NS असा एक हॅशटॅगही लिहिला आहे.
नव्या नात्याविषयी पवित्रा काय म्हणाली?
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा पुन्हा नव्यानं प्रेमात पडण्याविषयी असं म्हणाली, “हो, मी पुन्हा प्रेमात पडली आहे. यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे. कारण- मी ती त्याच्या कुटुंबासह साजरी करणार आहे. मी परदेशात जाणार आहे. कारण- तो आणि त्याचं कुटुंब सध्या तिथेच आहे. माझ्या कुटुंबाशिवाय दिवाळी साजरी करताना थोडंसं वाईट वाटतंय; पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मिळणार याचा खूप आनंद आहे.”
पवित्रा पुनियाने शेअर केले साखरपुड्याचे फोटो
यापुढे पवित्रा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणाली, “तो अभिनेता नाही. तो एक व्यावसायिक आहे आणि एक अत्यंत समजूतदार, प्रेमळ व्यक्तीसुद्धा आहे. आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र आहोत आणि हे नातं खूपच खास आहे.” दरम्यान, पवित्रानं शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला कमेंट्समध्ये होणाऱ्या नवऱ्याविषयी विचारणादेखील केली आहे.
