‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. मात्र आता हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटलं जात आहे. नुकतंच यावर सोनी मराठी वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे.
सोनी मराठी वाहिनीवर ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. येत्या ५ जानेवारीपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याबरोबर अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे.
आणखी वाचा : चित्रा वाघ यांनी अटकेची मागणी केलेल्या उर्फी जावेदची संपत्ती कोट्यावधींच्या घरात, दर महिन्याला कमावते ‘इतके’
या सर्व कलाकारांचे अनेक प्रोमोही समोर आले आहेत. हे प्रोमो पाहिल्यावर अनेकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम बंद होणार का? असा प्रश्न पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्तही व्हायरल होताना दिसत आहे. मात्र आता त्यावर सोनी मराठीने स्पष्टीकरण दिले आहे.

आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…
नुकतंच ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. या प्रोमोवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा बंद नका करु’, अशी विनंती या चाहत्याने केली आहे.
त्यावर सोनी मराठीने उत्तर देताना म्हटले की, “नमस्कार, ५ जानेवारीपासून पोस्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका गुरुवार ते शनिवार रात्री ९ वाजता दाखवली जाणार आहे. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोमवार ते बुधवार या तीन दिवशी रात्री ९ वाजता असणार आहे”, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे आता आठवड्यातील फक्त तीन दिवस प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे.