Prajakta Gaikwad Talks About Late Actress Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्रिया कर्करोगाने ग्रस्त होती. तिने खूप खंबीरपणे या आजाराचा सामना केला, परंतु नशिबापुढे कोणाचे काही चालत नाही असं म्हणतात, तसंच प्रियाच्या बाबतीतही झालं आणि तिने ३१ ऑग्स्ट रोजी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या जाण्याने कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.
प्रिया मराठेच्या निधनामुळे मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तिच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देत ती आता या जगात नसल्याची खंत व्यक्त केली. अनेकांनी तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. अशातच ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही प्रियाबद्दल प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे.
प्राजक्ता गायकवाडची प्रिया मराठेबद्दल प्रतिक्रिया
प्राजक्ता गायकवाडने ‘स्टारविश्व’शी संवाद साधताना प्रियाबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्राजक्ताला “प्रियाताई जिच्याबरोबर तू काम केलेलं आहे तिचं कर्करोगाने निधन झालं, काय आठवणी होत्या तुझ्या तिच्याबरोबर” असं विचारण्यात आलेलं. यावर प्राजक्ता म्हणाली, “मी टीव्हीवर ही बातमी पाहिली तेव्हा माझ्यासाठी हे सगळं खूप धक्कादायक होतं. प्रियाताई माझी आवडती अभिनेत्री होती.”
प्राजक्ता गायकवाडने सांगितल्या प्रिया मराठेबरोबरच्या जुन्या आठवणी
प्राजक्ता पुढे म्हणाली, “‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत आम्ही एकत्र काम केलेलं. त्यात तिने गोदावरीची भूमिका साकारलेली, त्यामुळे आमचे एकत्र खूप सीन व्हायचे. आम्ही कित्येक दिवस एकत्र शूट करत होतो. माझ्यासाठी ही खूप अनपेक्षित बातमी होती. ती खूप खंबीर होती. फिटनेसकडे, डाएटकडे तिचं खूप लक्ष असायचं. मला माहीत नाही असं का झालं, पण किंबहुना असं असेल की, जी लोकं आपल्याला आवडतात तीच देवालाही आवडतात. पण, अजून आम्हाला ती हवी होती, कारण खूप मोठी, अनुभवी आणि छान अभिनेत्री गमावलीये मराठी चित्रपटसृष्टीने असं वाटतं.”
प्राजक्ता गायकवाड पुढे म्हणाली, “खूप छान स्वभाव होता तिचा. खूप शिस्तप्रिय होती ती. शंतनू दादाबरोबर तर मी पूर्ण मालिका केली आहे, त्यामुळे तो किती चांगला आहे आणि तिला तो कसा प्रत्येक बारीक गोष्टीत पाठिंबा द्यायचा हे आम्ही स्वत: पाहिलं आहे. त्यामुळे ही बातमी कळल्यानंतर दोन मिनिट मी स्तब्ध होते, मला धक्का बसला होता आणि कळत नव्हतं की हे असं कसं होऊ शकतं. मी पुन्हा ती बातमी बघितली. दुसऱ्या वाहिनीवर पाहिली की हे खरं आहे का?”
दरम्यान, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाईंची तर प्रिया मराठेने गोदावरीची भूमिका साकारल्या होत्या. दोघींनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळालेली. अजूनही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना विसरलेले नाही.