Prajakta Mali and Lalit Prabhakar Video: प्राजक्ता माळीला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. २०१३ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळजवळ दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. २०१५ ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

या मालिकेत प्राजक्ताबरोबर अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत होता. प्राजक्ताने मेघना ही भूमिका साकारली होती, तर ललितने आदित्य ही भूमिका साकारली होती. आदित्य व मेघना यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले होते.

या मालिकेत उदय टिकेकर, शर्मिष्ठा राऊत, सुकन्या मोने, गिरीश ओक, मधुगंधा कुलकर्णी, सायली देवधर असे अनेक कलाकार दिसले होते. ही मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर या कलाकारांनी विविध मालिका, चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध भूमिकांची छाप पाडली. आता दहा वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार एका मंचावर दिसले आहेत.

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर दिसणार एकत्र

ललित प्रभाकर, रिद्धिमा पंडित, ऋचा वैद्य यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ललित प्रभाकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर उपस्थित असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने सोनी मराठीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ललित प्रभाकर म्हणतो की ‘प्रेमाची गोष्ट ‘चा जेव्हा विषय चालू होता तेव्हा तुझी आठवण आली. त्यावर प्राजक्ता ‘अगं बाई’ असे म्हणताना दिसते. त्यानंतर ललित म्हणतो, मला गाण्यातील दोन ओळींवर परफॉर्म करायला आवडेल. त्यानंतर ललित व प्राजक्ता ‘ओल्या सांजवेळी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने, “प्रेमाची गोष्ट २’च्या निमित्ताने विनोदाच्या मंचावर अनुभवू या ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचा नृत्याविष्कार” असे लिहिले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “तुम्ही दोघं लग्न करा”, “तुम्ही दोघं एका रोमँटिक चित्रपटात काम करा”, “जुळून येती रेशीमगाठीच्या चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत”, “आदित्य व मेघना यांच्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल होणार”, “वाह! मी या क्षणाची किती दिवसांपासून वाट बघत आहे, अखेरीस इतक्या वर्षांनंतर दोघांचा एकत्र डान्स बघायला मिळाला. हे दोघे एकत्र हास्यजत्रेत आल्यावर लोकं इतकी खूश होतात. दोघेही बेस्ट दिसतात. यांचा एक रोमँटिक चित्रपट यायला हवा”, “क्यूट कपल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

तर प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “या गाण्यावर आपण डान्स केल्यापासून मी सतत हे गाणे ऐकत आहे आदित्य”, तसेच तिने ‘प्रेमाची गोष्ट २’साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, आता ‘प्रेमाची गोष्ट २’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच हे कलाकार कोणत्या चित्रपटात, मालिकेत एकत्र दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.