Prajakta Mali On Misuse Of Social Media :सोशल मीडिया हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा जणू एक भाग झाला आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडियावर अपडेट राहणं, फोटो-व्हिडीओ शेअर करणं हे आता एक फॅडच झालं आहे. सामान्य जनतेसह विविध क्षेत्रांतील मंडळीसुद्धा या सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारही सोशल मीडियाचा वापर करतात.

बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर या अभिनेत्री आपल्या सिनेमा, मालिकांबाबतच्या अपडेट्स देतात. तसंच काही नवनवीन लुक्समधील फोटोसुद्धा शेअर करताना दिसतात. अनेक चाहते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रेम व्यक्त करताना दिसतात. मात्र, सोशल मीडियाची जशी एक चांगली बाजू आहे, तशीच दुसरी वाईट बाजूसुद्धा आहे.

सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांकडून कलाकारांचे विशेषत: अभिनेत्रींचे फोटो-व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट किंवा मॉर्फ करून शेअर केले जातात. सोशल मीडियाच्या याच चुकीच्या वापराबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचं मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना, उद्योजिका यासह निर्माती म्हणून प्राजक्ता माळी लोकप्रिय आहे. आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं चर्चेत राहणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

याच सोशल मीडियाबद्दल तिनं आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. प्राजक्तानं ‘MHJ Unplugged’ या कार्यक्रमात समाजमाध्यमांच्या वापराबद्दल असं म्हटलं, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नव्हती; पण आता मला सोशल मीडियाची भीती वाटते. मला एकदा सायबर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी दोन मुलांना पकडलं होतं. त्यातील एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. त्याचं वय साधारण १९-२० वर्ष होतं. त्यानं एक प्रोफाईल उघडलं होतं, त्याच्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडीओ होते.”

प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे प्राजक्ता सांगते, मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की, तू असं का केलंस. तर त्याचं उत्तर असं होतं की, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं’. खरं तर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्यानं ते टाकलं होतं. त्याशिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की, त्यानं काय केलंय. त्यावेळी मला विनंती करीत तो मुलगा म्हणाला, ‘कृपया माझ्या घरी हे सांगू नका. कारण- माझे वडील मला चाबकाने मारतील.’ “

सोशल मीडियाच्या वापराबाबत प्राजक्ता माळीने दिला ‘हा’ सल्ला

त्यानंतर ती सर्वांना आवाहन करीत असं म्हणाली, “तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. मीदेखील हे करीत नाही. मला ती गोष्ट फार आवडते, ज्यामध्ये एक मोठा हत्ती आहे आणि चार माणसं असतात. एकाच्या हातात शेपूट आलं. एकाच्या हातात सोंड आली, तर तिसऱ्याच्या हातात पाय आला, त्यानुसार ते त्यांचं नट बनवतात. अशी परिस्थिती आहे. खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला पूर्ण चित्र माहीतच नसतं. त्याशिवाय जे काही आपल्या हाताला लागतं, त्यावरच आपण बोलत असतो. म्हणून सावधगिरी बाळगा.”