Prarthana Behere & Shreyas Talpade Spotted Together : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे हे दोघे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांनी ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केलेलं. त्यामधील त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं. त्यामुळे आजही प्रेक्षक त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात.

प्रार्थना बेहेरे अलीकडेच ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटातून झळकलेली. लवकरच ती काही आगामी चित्रपटांतून पाहायला मिळणार आहे. अशातच आता ‘राजश्री मराठी’ने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे व दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र पाहायला मिळत आहेत.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये प्रार्थना, श्रेयस व अजय मयेकर श्री स्वामी समर्थांच्या मंदिरातून बाहेर येताना दिसले. तर महत्त्वाचं म्हणजे श्रेयसच्या हातात एक फाइल असून, त्यात त्यांच्या आगामी कलाकृतीची स्क्रिप्ट असल्याची शक्याता वर्तवली जात आहे.

प्रार्थना, श्रेयस पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाल्यामुळे आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र झळकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रेक्षकांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरेल. बऱ्याचदा सोशल मीडियावर या ऑनस्क्रीन जोडीला पुन्हा मालिकेतून एकत्र पाहायचंय, अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रार्थना व श्रेयस पुन्हा एकत्र झळकणार का? तसेच ते मालिकेतून की चित्रपटातून कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील हे पाहणं रंजक ठरेल.

प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका २३ ऑग्स्ट २०२१ रोजी सुरू झालेली आणि २२ जानेवारी २०२३ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अजय मयेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलेलं. तर, प्रार्थना व श्रेयस यांच्याबरोबर यामध्ये इतरही लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेले.

प्रार्थना व श्रेयस यांनी पहिल्यांदाच एकत्र या मालिकेतून काम केलेलं. त्यांनी यामध्ये साकारलेल्या नेहा व यश या भूमिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या. त्यामुळे प्रेक्षकांनाही या दोघांना पुन्हा एकत्र पाहताना आनंद होणार आहे.