Mrunal Dusanis Share Memories of Priya Marathe : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगावर उपचार घेत होती. यावर अभिनेत्रीने यशस्वी मातदेखील केली होती. पण तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि ३१ ऑगस्ट रोजी पहाटे तिने या जगाचा निरोप घेतला.

उत्तम अभिनय तसंच आपला मनमिळाऊ स्वभाव यामुळे प्रिया इंडस्ट्रीमधील अनेकांच्या जवळची मैत्रीण होती. यामुळेच तिच्या निधनानंतर सहकलाकारांनी सोशल मीडियावर प्रियासाठी भावुक पोस्ट शेअर केल्या. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रियाच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं.

प्रिया ‘चार दिवस सासूचे’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसंच तिने ‘तू तिथे मी’ या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात तिच्याबरोबर मृणाल दुसानिस ही अभिनेत्रीसुद्धा होती. प्रियाच्या निधनानंतर मृणालने भावुक पोस्ट शेअर केली होती.

अशातच आता एका मुलाखतीत मृणालने पुन्हा एकदा प्रियाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “आम्ही एकमेकांना वेडे असंच म्हणायचो आणि हा तिनेच सुरू केलेला शब्द आहे. आम्ही कॉल किंवा मेसेजवर कायम एकमेकींना वेडे याच नावाने हाक मारायचो. प्रिया इतक्या मोठ्या संकटात हे आम्हालासुद्धा फार उशीराच कळलं. ती एकटीच या संकटाचा खूप दिवस, खूप महीने सामना करत राहिली.”

यानंतर मृणाल म्हणते, “आता काही दिवसांपर्यंत आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि या प्रत्येकवेळी आम्ही तिला ‘काळजी घे’ असं म्हणायचो. प्रत्येक गोष्टीत प्रियाचं नाव यायचंच. चांगली, आनंदी कोणतीही गोष्ट असो, त्यात प्रिया असायचीच. ती खूपच खास मुलगी होती. आज मोबाईल उघडताच सगळीकडे प्रिया दिसतेय. याचं कारण ती मुलगी तशीच होती.”

पुढे मृणाल भावुक होत म्हणते, “एक उत्तम अभिनेत्री, एक उत्तम व्यक्तिमत्व असलेली मुलगी आता आपल्यात नाही, याबद्दल काही बोलण्यासारखंच नाही. आम्ही कायम तिला ही विनंती करत होतो की, एकदा तरी आम्हाला भेट. पण ती भेट झालीच नाही आणि यात आठ महीने गेले. आठ महिन्यांत आमची भेट झाली नाही, याचंच खूप दु:ख आहे.”