Raqesh Bapat Reveals His Mothers Reaction: काही मालिका या प्रेक्षकांसाठी खास असतात. त्या मालिकेतील पात्रे आपलीशी वाटू लागतात. अशा मालिका संपताना प्रेक्षकांना वाईट वाटते. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
‘नवरी मिळे हिटलरला‘ ही मालिका अगदी कमी कालावधीत लोकप्रिय ठरली. या मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या वेगळेपणामुळे लोकप्रिय ठरले. एजे व लीला या प्रमुख पात्रांनी जितके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, तितकेच मालिकेतील सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, आजी, रेवती, यश, किशोर, विश्वा, प्रमोद या सगळ्या पात्रांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. आता या मालिकेचे शूटिंग संपत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ संपण्याबाबत राकेश बापटच्या आईची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराजने साकारली आहे. तर एजे ही भूमिका अभिनेता राकेश बापटने साकारली आहे. एजे व लीलाच्या जोडीला मोठी लोकप्रियता मिळाली. त आता राकेश बापटने एका मुलाखतीत मराठी मालिकेत पहिल्यांदाच काम करण्याबाबत वक्तव्य केले आहे.
राकेश बापट व वल्लरी विराज यांनी नुकताच टेलिगप्पाशी संवाद साधला. यावेळी राकेश बापट म्हणाला, “‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये काम करणं हे माझं मराठी मनोरंजन विश्वातील पहिलं पाऊल होतं. आईची इच्छा होती, ती मी पूर्ण करू शकलो. आईच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणूनच मी हे केलं. मराठी मालिकेत काम करण्याचा उद्देश तोच होता. मात्र, प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं, हा बोनसच फार भारी वाटला.”
आईला जेव्हा मालिका संपणार आहे हे सांगितलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती? याचे उत्तर देताना राकेश बापट म्हणाला, “आईची प्रतिक्रिया अशी होती की हे माझं स्वप्न होतं आणि माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. एवढ्या लवकर मालिका संपायला नको होती. तर आईला मी म्हणालो की, मी तुझ्यासाठी आणखी एक मालिका करेन, काळजी करू नकोस.”
दरम्यान, एजे व लीला ही जोडी प्रचंड गाजली. आता सोशल मीडियावर ही मालिका संपत असल्याचे पाहून चाहते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कडक शिस्तीचा एजे व गोंधळ घालणारी लीला अशी ही जोडी प्रेक्षकांची लाडकी ठरली. आता हे कलाकार कोणत्या मालिकेतून आणि कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.