Reshma Shinde Celebrates Vat Purnima : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकली. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. तिच्या लग्नाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती, यामुळेच रेश्माच्या लग्नाला मालिकाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. याचा खास व्हिडीओ रेश्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशी मान्यता आहे. यामुळेच विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाभोवती सात फेरे घेऊन, मनोभावे पूजा करून हा सण साजरा करतात. अभिनेत्री रेश्मा शिंदेची लग्नानंतरची ही पहिली वटपौर्णिमा आहे. अभिनेत्रीने राहत्या घरी नवऱ्यासह वटसावित्रीची पूजा करून हा सण साजरा केला.

लग्नानंतर प्रत्येक सण रेश्मा हौसेने साजरा करते. तिचा पती पवन हा साऊथ इंडियन आहे. तो आयटी क्षेत्रात काम करतो. होळी असो किंवा गुढीपाडवा पवन सुद्धा प्रत्येक मराठी सण तेवढ्याच आपुलकीने साजरा करतो. वटपौर्णिमेच्या सणाला रेश्माने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. पोपटी रंगाच्या व त्याला गुलाबी काठ असलेल्या पैठणी साडीत रेश्मा खूपच सुंदर दिसत होती. तर, तिचा पवनने देखील बायकोच्या साडीला कॉन्ट्रास्ट मॅच होईल असा बेबी पिंक रंगाचा कुर्ता घातला होता.

रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि पवन जोडीने सात फेरे घेत वटपौर्णिमेची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला माझी पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन दिलं आहे. रेश्माच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विशाल निकम, शर्वरी जोग, अभिज्ञा भावे, प्रतीक्षा मुणगेकर या कलाकारांनी रेश्माच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते.