Reshma Shinde Dance Video : ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती ‘जानकी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी या मालिकेत अवंतिका म्हणजेच जानकीच्या धाकट्या जाऊबाईच्या भूमिकेत झळकत आहे.
जानकी आणि अवंतिका या दोघींचं ऑनस्क्रीन खूप चांगलं बॉण्डिंग पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे ऑफस्क्रीन सुद्धा रेश्मा आणि ऋतुजा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या नेहमीच सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. सध्या रेश्मा आणि ऋतुजाचा एक डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. कारण, यामध्ये दोघींनी मिळून आनंद शिंदेंच्या सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या “त्या नटीनं मारली मिठी मला…” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
मालिकेच्या सेटवरच या दोघी भन्नाट डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या छोट्या पडद्यावरील मालिका आठवड्याचे सातही दिवस प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे सगळेच कलाकार व्यग्र असतात. यालाच अनुसरुन रेश्माने या भन्नाट डान्स व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे.
“सध्या आमच्या मालिकेच्या शूटिंगमधून आम्हाला जेवायला, झोपायला आणि श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो पण, रील व्हिडीओ बनवताना…” असं कॅप्शन देत रेश्माने पुढे हसायचे इमोजी जोडले आहे. या ऑनस्क्रीन जावांची भन्नाट केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. या व्हिडीओला अवघ्या एका दिवसात ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
याशिवाय रेश्मा अन् ऋतुजाचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिज्ञा भावे, भक्ती देसाई या अभिनेत्रींनी कमेंट्समध्ये रेश्माचं कौतुक केलं आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी “आता डान्स करून झाला असेल तर मालिकेत नानांना शोधा” असा मजेशीर सल्ला जानकी आणि अवंतिकाला दिला आहे.
दरम्यान, रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं आहे. ही मालिका टीआरपीच्या आकडेवारीत सातत्याने टॉप – ५ मध्ये असते. यामध्ये रेश्मा आणि सुमीतसह प्रतीक्षा मुणगेकर, आरोही सांबरे, आशुतोष पत्की, सविता प्रभुणे, उदय नेने, भक्ती देसाई, नयना आपटे, प्रमोद पवार, ऋतुजा कुलकर्णी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.