Rohan Mehra Supports Ashnoor Kaur : अशनूर कौर हिंदी टेलीव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘बिग बॉस’मुळे सध्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता घरात अशनूरला बॉडी शेमिंग केल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या ऑनस्क्रीन भावाने पोस्ट शेअर करीत प्रतिक्रिया दिली आहे.
अशनूर कौरने ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’मध्ये नायरा ही भूमिका साकारलेली. त्यामध्ये तिच्यासह अभिनेता रोहन मेहराही झळकला होता. त्याने यात तिच्या मोठ्या भावाची भूमिका साकारलेली. तेव्हापासून दोघे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी झाले असून, ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांबरोबर रक्षाबंधन साजरा करताना दिसतात.
रोहन मेहरा काय म्हणाला?
अशनूरला अशातच बॉडी शेमिंग केल्यामुळे रोहन भडकला असून, त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तान्या मित्तल, नीलम गिरी व कुनिका सदानंद यांच्याबद्दल राग व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत त्याने म्हटले, “बॉडी शेमिंग करणं खूप चुकीचं आहे. अशनूर कौरबरोबर जे घडलं, ते चुकीचं आहे आणि त्यावर आक्षेप घ्यायला हवा.” पुढे त्याने, “लाज वाटायला हवी”, असे म्हणत कुनिका सदानंद, नीलम गिरी व तान्या मित्तल यांना टॅग केले आहे.
अशनूरबरोबर बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलेलं?
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार अशनूर कौर प्रणीत मोरेबरोबर गप्पा मारत बसलेली असताना नीलम अशनूरकडे बघत कुनिका व तान्या यांना म्हणाली, “जुरासिक पार्क बघणार का?” त्यावर कुनिका जोरजोरात हसल्या. नीलम व तान्या अशनूरच्या वजनाबद्दल बोलताना दिसल्या. तान्या मित्तल म्हणाली, “अशनूर रोज जिम करूनही तिचं वजन वाढतच आहे. तिनं आधी वजन कमी केलं होतं; पण आता पुन्हा तिचं वजन वाढलं आहे आणि आता ती तिच्या आईसारखी दिसायला लागली आहे.”

दरम्यान, अशनूर सध्या बिग बॉसच्या घरातील तिच्या खेळामुळे चर्चेत आहे. जसजसा हा खेळ पुढे जात आहे तसतसे यातील स्पर्धक घराबाहेर जात आहेत. तर, काही नवीन स्पर्धकांचीही एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे आता या खेळात पुढे कोणते स्पर्धक शेवटपर्यंत टिकून राहणार आणि एकमेकांना टक्कर देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
