Rohini Hattangadi Talks About Health Problems : रोहिणी हट्टंगडी या मराठी व हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी हिंदी, मराठी व गुजराती नाटक, मराठी मालिका आणि अनेक चित्रपटांत काम केलं आहे. सध्या त्या ‘ठरलं तर मग’ मलिकेमुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या सेटवरचा एक प्रसंग सांगितला आहे.
रोहिणी हट्टंगडी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णाआजी हे पात्र साकरत आहेत. यापूर्वी हे पात्र दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारायच्या, परंतु त्यांच्या निधनानंतर रोहिणी या मालिकेतील त्यांचं पात्र पुढे नेत आहेत. अशातच त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ज्योती चांदेकर यांच्याबद्दलही सांगितलं आहे. यासह त्यांनी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेदरम्यानचा एक प्रसंगदेखील सांगितला आहे.
मुलाखतीत रोहिणी यांना तुम्हाला यापूर्वी मालिकेसाठी विचारणार होत होती का आणि ज्येष्ठ कलाकारांनी मालिकेत काम करत असताना स्वतःची काळजी घेणं किती गरजेचं आहे याबद्दल विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “थोडीशी काळजी मलाही होती की हे झेपणार आहे का आपल्याला. याआधी दोन दोन मालिका एकावेळेला केलेल्या आहेत, धावाधाव केलेली आहे, पण आता ते जमणार नाही असं लक्षात आल्यानंतर शक्य असेल तर थोडंसं थांबावं असं वाटतं; कारण प्रत्येकालाच ते जमणार नाही, यामागे बरीच कारणं असतात. पण, जर तसं नसेल तर फार घाई करू नये, आरामात काम करावं असं मला वाटतं. मलाही मालिकांसाठी विचारणा झालेली पण माझे दोन चित्रपट सुरू होते मग सगळं एकत्र जमणार नाही म्हणून मी त्या मालिका केल्या नाहीत.”
रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
रोहिणी पुढे म्हणाल्या, “त्यामुळे काळजी तर घेतलीच पाहिजे, कारण या वयात अनेक व्याधी असतात किंवा नवीन उद्भवू शकतात. एकदा तर माझं गुजराती नाटक सुरू होतं आणि त्याच सुमारास ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका सुरू होती. तेव्हा मला बीपीचा त्रास चालू झाला. त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं की ड्रायव्हिंग करायचं नाही. त्यानंतर मग तो विषय माझ्या मुलांनी उचलून धरला आणि सांगितलं की तू ड्रायव्हिंग नाही करायचं; मग तेव्हापासून माझ्याकडे ड्रायव्हर आहे.”
रोहिणी हट्टंगडी यांची ज्योती चांदेकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया
रोहिणी हट्टंगडी पुढे म्हणाल्या, “आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही हे पाहून ते किती प्रमाणात केलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आणि समजा जर काम करावंच लागेल अशी परिस्थिती असेल तर मग ते किती केलं पाहिजे हे बघायला हवं.” पुढे त्यांनी ज्योती चांदेकर यांच्याबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही फार एकत्र काम केलं नाही, पण आमच्या दोघींचं पहिलं नाटक एकच होतं, ‘सुंदर मी होणार.’ त्यात मी बेबी राजे ही भूमिका साकारलेली आणि तिने मेनका ही भूमिका साकारलेली. माझ्या वडिलांनीच त्याचं दिग्दर्शन केलेलं.”
ज्योती यांच्याबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “राज्य नाट्य स्पर्धेसाठी माझ्या वडिलांनी ‘सुंदर मी होणार’ हे नाटक १९६३-१९६४ सुमारास बसवलं होतं. तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच एकमेकांना ओळखायला लागलो. मग त्यानंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले, मग पुण्यात आले, नंतर मुंबईत आले आणि मी हिंदी चित्रपट केले; त्यामुळे आमचा संपर्क असा राहिला नव्हता. पण, कधी भेट झाली तर आम्ही गप्पा मारायचो. मला तिची ‘मित्र’मधील भूमिका खूप आवडलेली. तिने खूप छान काम केलं होतं, तेवढीच आठवण आहे.”
