Rohit Arya Case Actor Aayush Sanjeev Post : मुंबईतल्या पवई येथील शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोपी रोहितच्या ताब्यात असलेल्या मुलांना सोडविण्याचा प्रयत्न करताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. आणि त्यात रोहित आर्यच्या छातीवर गोळी लागली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी हा सगळा धक्कादायक प्रसंग घडला. पवईमधील आरए स्टुडिओच्या इमारतीत १७ मुलं आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून त्यांना जाळण्याची धमकी रोहित आर्यनं दिली होती. बनावट ऑडिशन आयोजित करून सुमारे १०० विद्यार्थ्यांना बोलावून घेतले होते. त्यापैकी बहुतेकांना परत पाठवल्यानंतर त्यानं १७ मुलं आणि दोन वृद्धांना स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलं होतं.
या घटनेनंतर रोहित आर्य यानं याआधी काही मराठी कलाकारांना संपर्क साधल्याची माहितीसुद्धा समोर आली. या घटनेविषयी कळताच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. अशातच आता मराठी अभिनेता आयुष संजीवनंही घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्यची भेट घेतली होती, असं म्हटलं आहे. आयुषनं त्याच्या सोशल मीडियावर संबंधित व्यक्ती रोहित आर्यबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आयुष असं म्हणतो, “हा प्रकार घडण्याच्या फक्त दोन दिवसांपूर्वीच मी रोहित आर्यला भेटलो होतो. त्यानं आपल्या आगामी चित्रपट ‘Let’s Change 4’मध्ये एका भूमिकेसाठी ऑफर दिली होती. त्यावेळी त्यानं सांगितलेली कथा आणि नंतर घडलेल्या या घटनांमध्ये साम्य होतं. त्यामुळे ही संपूर्ण घटना माझ्यासाठी अजूनही धक्कादायक आहे.”
रोहित आर्यबद्दल आयुष संजीवनं शेअर केली पोस्ट

त्यानंतर आयुष या पोस्टमध्ये म्हणतो, “मी त्याला जवळपास आठ-नऊ वर्षांपूर्वी त्याच्या पहिल्या चित्रपटादरम्यान भेटलो होतो. त्या काळातील आमच्या संबंधांवरून मला त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं. पण आता जे काही घडलं आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. मी त्या कार्यशाळेतील मुलांना भेटलो होतो आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढला होता. तेव्हा सर्व काही नॉर्मल वाटत होतं. नशिबानं ती सगळी मुलं सुरक्षित आहेत.”

दरम्यान, रोहित आर्य या प्रकरणानंतर मुंबई हादरून गेली आहे. त्याच्याशी संबंधित अनेक मराठी कलाकारांची नावं आहेत. ऊर्मिला कोठारे, डॉ. गिरीश ओक, रुचिरा जाधव या कलाकारांचा त्याच्याशी संबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता आयुषनंही रोहित आर्यबरोबर काम केल्याची पोस्ट शेअर केली आहे.
