Ronit Roy First Wife : लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयची पत्नी नीलम सिंह आहे हे सर्वांना माहित आहे. पण नीलमआधी रोनितचं एक लग्न झालं होतं आणि त्या लग्नापासून त्याला मुलगी देखील आहे. रोनित रॉयची पहिली मुलगी ही दिग्गज दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या नात्यातली होती.

रोनित रॉय हा दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचा जावई होता. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव जोहेना मुमताज खान आहे. रोनित व जोहेना यांनी ९० च्या दशकात लग्न केलं होतं, पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. ते विभक्त झाले आणि जोहेना मुलीला घेऊन अमेरिकेला निघून गेली.

रोहित व जोहेनाला झाली मुलगी

जोहेना मुमताज खान ही दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची भाची आहे. वृत्तानुसार, जोहेना ही दिलीप कुमार यांची बहीण आणि ताज यांची मुलगी आहे. लग्नानंतर रोनित आणि जोहेना यांना एक मुलगी ओना रॉय झाली. पण, ओना फक्त सहा महिन्यांची असताना रोनित आणि जोहेनाचा घटस्फोट झाला.

रोनितपासून घटस्फोट घेतल्यावर जोहेना मुलगी ओनाला घेऊन अमेरिकेला निघून गेली. ओना व रोनित यांचं बाँडिंग चांगलं आहे. पण जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा मुलीपासून दूर राहणं रोनितसाठी सोपं नव्हतं. रोनितने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “ओनाला माहितीये की मी तिचा बाबा आहे. ती ६ महिन्यांची असताना माझा व तिच्या आईचा घटस्फोट झाला. मी वर्षभरातून एकदाच तिला भेटू शकायचो, तेही खूप कमी काळासाठी,” असं रोनित म्हणाला होता.

“मी माझ्या मुलीच्या आयुष्यातील २० वर्षे गमावली. मी तिच्या आयुष्याचा भागच राहिलो नाही. याचा विचार केला की मला खूप त्रास होतो. ती जसजशी मोठी होत आहे, तसतसं आमचं नातं घट्ट होत चाललंय,” असं रोनितने म्हटलं होतं.

रोनित रॉयचं दुसरं लग्न

पहिलं लग्न मोडल्यानंतर काही वर्षांनी रोनितची भेट मॉडेल नीलमशी झाली. एका पार्टीत ते भेटले आणि एकमेकांकडे आकर्षित झाले. दोघेही पहिल्या नजरेत प्रेमात पडले आणि एकमेकांना डेट करू लागले. नंतर दोघांनी २५ डिसेंबर २००३ रोजी लग्न केलं. त्यांना मुलगी अडोर व मुलगा अगस्त्य अशी दोन अपत्ये आहेत.

रोनितची मुलगी व नीलमची पहिली भेट

“माझी मुलगी फक्त १४ वर्षांची होती, तेव्हा ती नीलमला पहिल्यांदा भेटली होती. मला आठवतंय, मी कार चालवत होतो, नीलम माझ्या बाजूला बसली होती. आमच्याबरोबर ओना होती. नीलमला तिच्या घरी सोडल्यावर मी ओनाला म्हणालो की मला तुझ्याशी बोलायचंय. त्यावर ती म्हणाली, “बाबा, मला माहितीये तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं आहे.” मी न बोलताच तिला समजलं होतं,” असं रोनित मुलाखतीत म्हणाला होता.