Rupali Bhosle Car Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपालीने वेगवेगळ्या मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे, मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे. या मालिकेतल्या संजना या पात्राला प्रेक्षकांनी चंगलाच प्रतिसाद दिला. मालिकेतील संजना हे पात्र नकारात्मक असलं, तरीही प्रेक्षकांना खूप आवडायचे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी रुपाली सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ तसंच तिच्या नवीन कामाबद्दलची अपडेट शेअर करीत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या नव्या गाडीबाबत एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे.
रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला असून याबद्दलची माहिती तिने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. रुपालीने यावर्षी जानेवारी महिन्यात महागडी मर्सडीज गाडी खरेदी केली होती. या गाडीचा अपघात झाला असून बोनटचं नुकसान झाल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. रुपालीने हा व्हिडीओ शेअर करीत ‘अपघात झाला, वाईट दिवस’ अशा मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच तिने तुटलेला हार्ट इमोजीसुद्धा या व्हिडीओसह शेअर केला आहे.
या अपघाताबद्दल रुपालीने सध्या काही सविस्तर माहिती शेअर केली नसली तरी, यामुळे तिचे अनेक चाहते काळजीत पडले आहेत. दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीलाच रुपालीने मर्सडीज ही महागडी गाडी खरेदी केली होती. या नवीन गाडीच्या खरेदीचा व्हिडीओ तिने चाहत्यांबरोबर शेअर केला होता.
रुपाली भोसले इन्स्टाग्राम स्टोरी व्हिडीओ
दरम्यान, रुपालीबद्दल सांगायचं झाल्यास, ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेनंतर ती पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीवरीलच ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या मालिकेत रुपालीसह अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘लपंडाव’ ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेतून रुपाली आणि चेतनने स्टार प्रवाहवर कमबॅक केलं आहे. तर कृतिकाने या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे.