Rupali Bhosle Talk About Her Recent Car Accident oस्टार प्रवाहरील ‘लपंडाव’ या मालिकेमधून सरकार या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे, रुपाली भोसले. ‘लपंडाव’ या मालिकेआधी रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत होती. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी रुपाली सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते.
सोशल मीडियादवरे रुपाली तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिनं काही दिवसांपूर्वी नव्या गाडीचा अपघात झाल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं हा व्हिडीओ शेअर केला होता. अभिनेत्रीनं जानेवारी महिन्यात गाडी घेतली होती आणि लगेच काही महिन्यांनी हा अपघात झाला.
या व्हिडीओमध्ये रुपालीच्या नव्या गाडीच्या बोनेटचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा व्हिडीओ शेअर करीत तिनं ‘अपघात झाला, वाईट दिवस’ अशा मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या. अशातच आता रुपालीनं हा अपघात कुठे आणि कसा झाला, याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.
२९ सप्टेंबर रोजी झालेल्या गाडीच्या अपघाताबद्दल रुपालीनं नुकत्याच एका मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलं. मराठी मनोरंजन विश्वला दिलेल्या मुलाखतीत रुपालीनं सांगितलं, “घोडबंदर रोडवर हा अपघात झाला. एक कंटेनर मागे येत होता. त्या कंटेनरमागे माझी गाडी होती आणि माझ्या मागेसुद्धा आणखी एक कंटेनर होता. सुदैवाने पुढचा कंटेनर उतारात फार वेगानं मागे आला नाही. स्वामींचीच कृपा. जर तो वेगाने मागे आला असता; तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं.”
यापुढे रुपाली म्हणाली, “माझ्यावर येणारं ते संकट गाडीवर गेलं असं म्हणावं लागेल. सध्या गाडी वर्कशॉपमध्ये आहे. ती पुन्हा नवीन होऊन येईल. पण गाडीचं नुकसान झालं; याचं खूप वाईट वाटलं. कारण, खूप कष्टाने आणि मेहनतीने आपण आपली स्वप्नातली एखादी गाडी घेतो आणि त्याचं असं नुकसान झालं की खूप वाईट वाटतं. तो एक वाईट दिवस होता, असं म्हणावं लागेल.”
या वर्षाच्या सुरुवातीलाच रुपालीने मर्सिडीज ही महागडी गाडी खरेदी केली होती. या गाडीच्या खरेदीचा व्हिडीओ तिने चाहत्यांबरोबर शेअर केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच तिच्या या नव्या गाडीचा अपघात झाला. या घटनेनंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे काळजी व्यक्त केली होती. अशातच आता अपघाताप्रकरणी रुपालीनं माहिती दिली आहे.
दरम्यान, ‘लपंडाव’ या मालिकेत रुपालीसह अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देवही मुख्य भूमिकांत आहेत. १५ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रसारित केली जाते.