मनोरंजन सृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारां’ची घोषणा नुकतीच करण्यात आली. या पुरस्कारांवर शाहरुख खान, अभिनेता विक्रांत मॅसी आणि अभिनेत्री राणी मुखर्जी या बॉलीवूड कलाकारांनी आपलं नाव कोरलं. तसंच मराठी चित्रपटांनी आणि कलाकारांनीसुद्धा या पुरस्कारांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अशातच लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये टेलिव्हिजनच्या कलाकारांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. या पुरस्कारांमध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी यांसारख्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यात आला. मात्र, यात टेलिव्हिजनच्या कलाकारांचा उल्लेख झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

“चित्रपट कलाकार, कंटेंट क्रिएटर्स यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार आहेत. पण टीव्ही कलाकारांसाठी काहीच नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. Viral Bhayani शी साधलेल्या संवादात त्यांनी याबद्दल पुढे असं म्हटलं, “आम्ही टेलिव्हिजनचे कलाकार कोविडसारख्या काळातही काम करत होते. कोविडमध्ये सगळ्यांना त्यांचं शूटिंग पुढे ढकलण्याची किंवा रद्द करण्याची परवानगी होती. तसंच घरातून काम करण्याची किंवा घराबाहेर न पडण्याचीही मुभा होती. पण आम्ही टेलिव्हिजनचे कलाकार सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत होतो.”

यानंतर त्या म्हणाल्या, “चित्रपटसृष्टीतल्या एखाद्या अभिनेत्याने सलग दोन दिवस जरी काम केलं की, त्यावर लगेच बातम्या होतात. पण आम्ही कलाकार ज्याप्रकारे तेव्हा न थांबता काम केलं होतं; त्याची कुणीच दखल घेतली नाही. त्यामुळे मी सरकारला विनंती करते की, आम्हीसुद्धा खूप मेहनत घेतो. म्हणून सरकारने आमचंही कौतुक करावं.”

रुपाली गांगुली इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे रुपाली गांगुली यांनी असं म्हटलं, “स्मृती इराणी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा टीव्हीवर परत आल्या आहेत. ही मालिकादेखील माझ्या ‘अनुपमा’ मालिकेच्या चॅनेलवरच आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांच्या येण्याने टीव्ही इंडस्ट्रीकडे आणि कलाकारांकडे अधिक लक्ष वेधलं जाईल, असं मला वाटतं.”

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान आणि विक्रांत मॅसी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या. मात्र, टेलिव्हिजन या क्षेत्रासाठीही असा सन्मान हवा असल्याची इच्छा रुपाली यांनी व्यक्त केली आहे.