छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीमध्ये ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे नाव गेली अनेक वर्षं सामील आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ९ ऑगस्ट पासून ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ सुरू होणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रमुख प्रदर्शित झाला. तर आता या कार्यक्रमाच्या परीक्षकांची भूमिका कोण बजावणार हे समोर आलं आहे.
‘सारेगमप’ या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर या पर्वाचं परीक्षण कोण करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या याआधीच्या पर्वाचं परीक्षण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी केलं होतं. तर या पर्वातही हेच पाच जण परीक्षक म्हणून दिसणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याचं उत्तर मिळालं आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या आगामी पर्वाचं परीक्षण बॉलीवूडमधील आघाडीची गायिका करणार आहे.
आणखी वाचा : स्पृहा जोशी-क्षितिष दातेची प्रमुख भूमिका असलेली ‘लोकमान्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आलं समोर
आजपर्यंत स्पर्धक ऑडिशनला येतात पण ह्यावेळी सारेगमपचे परीक्षक अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत. या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक, गायक सलील कुलकर्णी आणि बॉलीवूडमधील आघाडीच्या गायकांपैकी एक मराठमोळी गायिका वैशाली भैसने-माडे सांभाळताना दिसणार आहेत. तर या दोघांबरोबरच या पर्वात सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
हेही वाचा : आई किंवा काकू नाही तर मुग्धाच्या आईला ‘या’ नावाने हाक मारतो प्रथमेश लघाटे, पोस्ट व्हायरल
त्यामुळे आता प्रेक्षक हा नवीन कार्यक्रम कधी सुरू होणार यासाठी उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत. हे नवीन पर्व म्हणजे प्रेक्षकांना संगीताची पर्वणीच ठरणार आहे.