Sankarshan Karhade’s poem:अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनय, सूत्रसंचालनाबरोबरच त्याच्या कवितांसाठीही लोकप्रिय आहे. मनाला भिडणारे शब्द, त्यातून चपखलपणे मांडले जाणारे भाव आणि अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनातील, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरील संकर्षणच्या कविता कायमच चाहत्यांना आवडतात.
आता त्याची एक कविता लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर संकर्षणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने खवय्यांवर एक छान कविता सादर केली आहे.
संकर्षण कऱ्हाडेची खवय्यांसाठी खास कविता
संकर्षण म्हणतो, “मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही, अहो, चवीनं खाणंसुद्धा काही खायचं काम नाही.सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे डोळे भरून बघावं, वदनी कवन म्हणावं आणि यज्ञकर्माला लागावं. ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान, पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान, अंदाजानं वापरावं लागतं चिमूट चिमूट मीठ, असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ…”
“तिथून पुढे सरकलात की, टप्पा चमचमीतपणाचा, जिथे असतं लोणचं, चटणी, मिरचीचा ठेचा, कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतंच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतंच, अहो चटण्या म्हणाल, तर जवस, कारळ, लसूण, शेंगदाणा, आंबा-लिंबाच्या लोणच्याचा चाटावा चवदार बाणा, हां ठेचा आयुष्यात जितका खाल, तितकी अनुभवाची साठवण होते. पण, ताटातलं पोटात जास्त गेलं की, सकाळी मात्र आठवण होते…”
पुढे संकर्षण म्हणतो, “जिच्यासाठी चाललेत सगळा प्रपंच, धंदा, नोकरी, पानाच्या अगदी मधोमध असते ती पोळी आणि भाकरी, गोल गोल गरम-गरम अशी आईनंच पानात वाढावी, पापुद्रा काढून वाफ आपण काढावी, मग मनसोक्त जेवणाऱ्यांना नसतं मुळी डाएटचं कारण. कारण- इथून पुढे येतं ते चिंच गुळाचं वरण. मग बाजूला कोण आहे, याची चिंता आपण का करावी, वरणात पोळी कुस्करावी आणि फुरकी मारावी… त्याशिवाय हे बिचारं पोट दुसरं काय मागतं? पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्य पणाला लागतं”, असे म्हणत संकर्षणने सुंदर कविता सादर केली आहे.
सध्या संकर्षण झी मराठी वाहिनीवर आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करीत आहे.