‘बिदाई’ फेम अभिनेत्री सारा खानने दुसरं लग्न केलं आहे. सारा खानने ‘रामायण’मध्ये लक्ष्मण ही भूमिका करणारे सुनील लहरी यांचा मुलगा क्रिश पाठकशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मुस्लीम साराने हिंदू क्रिशशी लग्न केल्यावर तिला ट्रोल केलं जात आहे. आता साराने इ्स्टाग्रामवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सारा खान आणि क्रिश पाठक यांनी लग्नाची बातमी दिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी या जोडप्याचं अभिनंदन केलं. तर काहींनी या दोघांची सांस्कृतिक आणि व पार्श्वभूमी वेगळी असल्याने टीका केली. या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल साराने व्हिडीओतून तिचं मत व्यक्त केलं.
सारा खानने तिच्या लग्नाबद्दल आणि धर्माबद्दलच्या येणाऱ्या नकारात्मक कमेंट्सवर प्रतिक्रिया दिली. “कृपया एक गोष्ट समजून घ्या की कोणताही धर्म तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही धर्माला किंवा इतरांच्या श्रद्धांना कमी लेखण्यास किंवा कोणाचाही अनादर करण्यास शिकवत नाही. आम्ही आमच्या हितचिंतकांना लग्नाची बातमी देतोय. आम्हाला कोणाचंही अप्रूव्हल नकोय, कारण आम्हाला आमच्या कुटुंबांने आणि कायद्याने मान्यता दिली आहे. माझं माझ्या देवाशी असलेलं नातं हे माझं नातं आहे. त्यामुळे माझ्यावर किंवा माझ्या देवावर टिप्पणी टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणताही धर्म तुम्हाला वाईट शब्द बोलण्यास किंवा कोणाच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यास शिकवत नाही,” असं सारा खान म्हणाली.
पाहा व्हिडीओ-
सारा व क्रिशला लग्नासाठी कुटुंबियांकडून पाठिंबा मिळाला. दोन्ही कुटुंबानी या नात्याचा आदर केला. “क्रिश आणि मी वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलो आहोत, पण आमच्या दोन्ही धर्मांनी आम्हाला प्रेमाची शिकवण दिली आहे. आमच्या कुटुंबियांनी आम्हाला सर्वात आधी इतरांचा आदर करायला आणि कोणालाही दुखवू नये हेच शिकवलं. आम्ही दोघे खूप सारखा विचार करतो. तुमच्या प्रेमाबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आभार मानू इच्छिते,” असं सारा खान म्हणाली.
सारा खानने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर तो क्रिशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रिपोस्ट केला. ‘तुझमें रब दिखता है यारा मैं क्या करूं’, असं कॅप्शन क्रिशने या व्हिडीओला दिलं. सारा व क्रिश यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. लवकरच ते पारंपरिक पद्धतीने निकाह व लग्नही करतील.
३६ वर्षांच्या सारा खानचं हे दुसरं लग्न आहे. साराचं पहिलं लग्न २०१० मध्ये बिग बॉसच्या घरात अली मर्चंटशी झालं होतं. पण काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सारा एका पायलटला डेट करत होती. जवळपास पाच वर्षांनंतर साराचं ते नातंही संपलं. त्यानंतर साराच्या आयुष्यात क्रिश आला. सारा व क्रिश यांनी वर्षभर डेट केल्यावर लग्न केलं आणि चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली.
सारा खान राम मिलाई जोडी, भाग्यलक्ष्मी, एक अंजान रिश्ते का गिल्ट, बेखुदी, लॉकअप या शोसाठी ओळखली जाते. तर क्रिशने बंदी युद्ध के या मालिकेत काम करून करिअरची सुरुवात केली. क्रिश खूप लहान असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्याचा सांभाळ त्याच्या आईने केला आहे. पण त्याचं वडिलांबरोबरही चांगलं नातं आहे.