Savalyachi Janu Savali Latest Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नुकतीच या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णीची एन्ट्रीसुद्धा झालेली पाहायला मिळाली. ती यामध्ये शिवानी कारखानीस ही भूमिका साकारत आहे. सारंगला बिझनेस आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याने शिवानीला राग आलेला असतो व सारंगला कार्यक्रमात हा परस्कार देताना तिच्या हाव भावातून ती ते सांगण्याचा प्रयत्न करतानाही दिसते. अशातच आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचं नवीन प्रोमोमधून पाहायला मिळतं.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सध्या सारंग मेहेंदळे कुटुंबाचा मोठा व्यवसाय सांभाळताना पाहायला मिळत आहे. त्याची आई तिलोत्तमानेच त्याला ही जबाबदारी दिली आहे. यावेळी त्याला सावलीची साथ मिळत असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, यादरम्यान ऐश्वर्या व राजकुमार हे दोघे त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये तिलोत्तमा मेहेंदळे मोठा निर्णय घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये तिलोत्तमा त्यांच्या रूपम कॉस्मेटिक्स या कंपनीसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने हा निर्णय सांगण्यासाठी मेहेंदळे कुटुंबीयांबरोबर प्रेसलाही बोलावलेलं असतं. यावेळी तिलोत्तमा प्रेसला “माफ करा, तुम्ही असा विचार करत असाल की इतक्यात परत एकदा का बोलावलं; तर आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे दुसऱ्यांदा आला आहात हा योग घडून आलाय माझ्या थोरल्या चिरंजीवांमुळे, म्हणजेच राजकुमार मेहेंदळेंमुळे.”
तिलोत्तमा घेणार महत्तवाचा निर्णय
प्रोमोमध्ये पुढे सारंग तिलोत्तमाला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळी राजकुमार त्याला म्हणतो, “नाही रे तिने जी चूक केलीये ना, सगळा व्यवहार तुझ्या हातात देऊन, रुपम कॉस्मेटिकची जी काही वाट लागलीये, तीच चूक आता तिला सुधारायची आहे.” यानंतर पुढे तिलोत्तमा म्हणते, “माझी ही कंपनी, माझा ब्रँड रुपम कॉस्मेटिक्स या सगळ्या व्यवहारातून मी माझ्या एका मुलाला बेदखल करणार आहे.” तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मेहेंदळे कुटुंबातील सगळ्यांना धक्का बसतो.
सारंग पुरस्कार सोहळ्यात त्याला पुरस्कार मिळाल्याचं श्रेय त्याच्या बायकोला सावलीला देत तिला मंचावर येण्याचा आग्र करतो, ते पाहून तिलोत्तमाला राग आलेला असतो, त्यामुळे आता तिलोत्तमा सारंगविषयी कुठला निर्णय घेणार का? मेहेंदळे कुटुंबाचा व्यवहार सारंग पाहत असल्याने तिलोत्तमा त्याला बेदखल करणार आहे की राजकुमारच्याबाबतीत कुठला निर्णय घेणार? नेमकं काय घडणार हे मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळेल.