Savlyachi Janu Savali Fame Actress Prapti Redkar : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे प्राप्ती रेडकर. बालपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. आजवर तिने ‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ आणि सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांमुळे प्राप्तीला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली.
अभिनयाप्रमाणेच प्राप्तीला नृत्याची देखील प्रचंड आवड आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर विविध डान्स रील्स देखील शेअर करत असते. प्राप्तीने नुकत्याच शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री बॉलीवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यातील “पिंगा गं पोरी पिंगा…” या गाण्यात दीपिका आणि प्रियांकाचा डान्स फेसऑफ पाहायला मिळतो. या दोघींनी नऊवारी साडी नेसून ‘पिंगा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याच लोकप्रिय गाण्यावर आता प्राप्तीने ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राप्ती रेडकरने सुंदर नऊवारी साडी नेसून ‘पिंगा’ गाण्यावर डान्स केला आहे. मूळ पिंगा गाण्यातील हुबेहूब डान्स स्टेप्स करत प्राप्तीने हटके एक्स्प्रेशन्स दिले आहेत. यामुळे तिच्या दमदार नृत्यशैलीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत प्राप्तीसह काम करणाऱ्या मेघा धाडे या डान्स व्हिडीओवर खास कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. “तू किती सुंदर डान्सर आहेस” असं मेघाने कमेंट्समध्ये म्हटलं आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी “नजाकत ऑन पॉईंट”, “प्राप्ती १ नंबर डान्स…आपली सावली सुपर डान्सर”, “प्राप्ती ताई खूप छान डान्स केलास”, “सुंदर नृत्य सादर केलंय”, “एक नंबर डान्स केलाय…कमाल नृत्यशैली” अशा प्रतिक्रिया सावलीच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये प्राप्ती रेडकरसह अभिनेता साईंकीत कामत प्रमुख भूमिकेत झळकला आहे. यांच्यासह मालिकेत सुलेखा तळवलकर, मेघा धाडे, वीणा जगताप, आशिष कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.