Savita Prabhune reveals story behind name of Satvika: ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी ‘पार्टी’, ‘लेक चालली सासरला’, ‘अबोध’, ‘कळत नकळत’, ‘फेका फेकी’, ‘दो नंबरी’, ‘तेरे नाम’, ‘लपंडाव’, ‘कळत-नकळत’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

मराठी चित्रपट, मालिका, नाटक याबरोबरच हिंदी चित्रपटांत महत्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘संस्कृती’, ‘संगम’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मैं ऐसी क्यूँ हूँ’, ‘इतिहास’, ‘आवाज-दिल से दिल तक’, ‘मला सासू हवी’, ‘जावई विकत घेणे’, आहे ते पवित्र रिश्ता, अनुपमा अशा मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

आता सविता प्रभुणे यांनी एका मुलाखतीत मुलीचं नाव सात्विका का ठेवलं आहे? याबद्ल खुलासा केला. तसेच, मुलीने त्यांचे कोणते चित्रपट पाहिले आहेत? आणि कोणते सिनेमे तिला वारंवार पाहायला आवडतात? यावर वक्तव्य केले.

मुलीचं नाव सात्विका ठेवलं कारण…

सविता प्रभुणे यांनी नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या मुलीच्या नावाबाबत म्हणाल्या, “सात्विकाचा जन्म ५ नोव्हेंबरला झाला. हा रंगभूमीदिन आहे. त्यामुळे नटराजाचा श्लोक आहे. त्यामध्ये सात्विक हा शब्द येतो. आम्हाला घरातील सर्वांना ते नाव खूप आवडलं. म्हणून आम्ही तिचं नाव सात्विका ठेवलं”, असे म्हणत त्यांनी सात्विका नावामागची गोष्ट सांगितली.

पुढे त्या म्हणाल्या, “सात्विकाने माझे चित्रपट पाहिलेले आहेत. आधीचेदेखील पाहिले आहेत. त्यामध्ये लपंडाव, कळत नकळत, मुंबई पुणे मुंबई आणि आताचा वडापाव हे सिनेमे पाहिले आहेत. तिला सिनेमे आवडतात. हे चित्रपट पुन्हा पुन्हा लागले तरी ती पाहते. त्यामुळे ती सुद्धा माझी चांगली प्रेक्षक आहे.”

सात्विका कोणत्या क्षेत्रात करतेय काम?

या मुलाखतीत त्यांना विचारले की तिला कधी या क्षेत्रात आवड निर्माण झाली का? यावर अभिनेत्री म्हणाल्या, “सात्विका तसं पाहायला गेलं तर याच क्षेत्रात काम करते. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते. फिल्मच्या बिझनेस या भागात काम करते. त्यामुळे मी अभिनय आणि ती याच क्षेत्रात बिझनेस विभागात काम करते.”

याच मुलाखतीत सविता प्रभुणे यांनी सध्या मराठीमध्ये चांगले चित्रपट बनत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सध्या त्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करताना दिसत आहेत.