Priya Marathe Husband Shantanu Moghe : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. ३१ ऑगस्ट रोजी मीरारोड येथील राहत्या घरी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. आजवर प्रियाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. प्रियाला गेल्या दोन वर्षांच्या कठीण काळात तिचा पती शंतनू मोघेने खंबीरपणे साथ दिली होती. याचबरोबर तो कामही करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने एका लोकप्रिय एन्ट्री घेतली होती. याबद्दल जाणून घेऊयात…
प्रिया मराठे आणि शंतनू मोघे हे दोघं २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. प्रिया ठाण्याची होती मात्र, शूटिंगमुळे ती अंधेरीत राहत होती. प्रियाच्या रुममेटमुळे दोघांची ओळख झाली. यानंतर ‘आई’ या मालिकेत शंतनू आणि प्रियाने एकत्र काम केलं. मालिका संपताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला या दोघांनी हे नातं गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यानंतर दोघांनीही कुटुंबीयांना नात्याची कल्पना देऊन थाटामाटात लग्न केलं होतं.
प्रियाच्या कठीण काळात शंतनूने तिची पूर्ण काळजी घेतली. काही दिवसांपूर्वीच शंतनूची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेच एन्ट्री झाली. ३० ऑगस्टला स्टार प्रवाहने इन्स्टाग्रामवर शंतनूच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला होता. शंतनू मोघे ‘येड लागलं प्रेमाचं’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या व्हिडीओला वाहिनीने, “राया – मंजिरीच्या आयुष्यात आलेला हा शंतनू नक्की कोण असेल?” असं कॅप्शन दिलं आहे.
शंतनू सुद्धा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. त्याची लेटेस्ट पोस्ट ही मालिकेत एन्ट्री घेतल्यानंतरची आहे. यापूर्वी त्याने मार्च महिन्यात एक व्हिडीओ शेअर केला होता. तर, प्रिया सुद्धा आजारपणामुळे सोशल मीडियापासून दूर होती. ११ ऑगस्ट २०२४ रोजी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती.
दरम्यान, प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आणि तिच्या जवळच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत तिच्याबद्दलच्या आठवणी, प्रियाने त्यांना केलेली मदत याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. प्रियाने आजवर ‘पवित्र रिश्ता’, ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘तू भेटशी नव्याने’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं.