Sharmishtha Raut Daughter Name : मराठीसह हिंदीत आपल्या दमदार अभिनयानं छाप उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शर्मिष्ठा राऊत. शर्मिष्ठानं आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ती गेल्या वर्षी ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या कोर्ट ड्रामा सीरिजमध्ये झळकली. सध्या शर्मिष्ठा निर्मिती क्षेत्रात जबरदस्त काम करत आहे. अशातच तिनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शर्मिष्ठा राऊतला मुलगी झाली असून लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर ती आई झाली आहे. या आनंदाच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

‘राजश्री मराठी’नं शर्मिष्ठा राऊतच्या मुलीच्या बारशाचे व्हिडीओ शेअर केल्यामुळे ही आनंदाची बातमी समोर आली आहे. शर्मिष्ठाच्या लाडक्या लेकीचं बारसं आज मोठ्या थाटामाटात झालं. यासाठी अभिनेत्रीनं आणि तिच्या पती तेजस देसाईनं खास मराठमोळा लूक केला होता. शर्मिष्ठानं पांढऱ्या आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर तेजसनं बायकोला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता, धोती, ज्यावर पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. दोघं या मराठमोळ्या पेहरावात खूप सुंदर दिसत होते.

शर्मिष्ठाच्या मुलीच्या बारशाला अनेक कलाकार मंडळींनी खास हजेरी लावली होती. अभिनेत्री खुशबू तावडे पती संग्राम साळवीबरोबर पाहायला मिळाली. नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून शर्मिष्ठा व तेजसला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अभिनेत्री हर्षदा खानविलकर शर्मिष्ठाच्या चिमुकल्या लेकीची नजर काढताना दिसली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, शर्मिष्ठाच्या लेकीचं नावं काय आहे? आणि त्याचा अर्थ काय आहे? माहितीये का? जाणून घ्या…

खुशबू तावडे इन्स्टाग्राम स्टोरी
खुशबू तावडे इन्स्टाग्राम स्टोरी
खुशबू तावडे इन्स्टाग्राम स्टोरी

बारशामध्ये शर्मिष्ठाच्या मुलीच्या नावाचा खुलासा कुटुंबातील सदस्यांनी अनोख्या पद्धतीनं केला. कुटुंबातील प्रत्येक सदस्य नावाचं इंग्रजी अक्षर आणून एका बोर्डवर लावताना दिसले. त्यानंतर शर्मिष्ठाच्या मुलीचं नाव सगळ्यांसमोर आलं. ‘रुंजी’ असं गोड नाव शर्मिष्ठा व तेजसच्या मुलीचं ठेवण्यात आलं आहे. यावेळी अभिनेत्रीनं ‘रुंजी’च्या नावामागचा अर्थ स्पष्ट केला. शर्मिष्ठा म्हणाली, “‘रुंजी’ नाव आहे, म्हणजे अकस्मात सुंदर. दुसरा अर्थ असा आहे की, मनात रुंजी घालणं म्हणजे मनात सतत घोळत राहणं. एकदा का रुंजीला बघितलं, तिच्याशी बोललं, तर ती कोणाच्या मनातून उतरणार नाही. सतत घोळत राहिलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतचं लग्न लॉकडाऊनदम्यान ऑक्टोबर २०२०मध्ये झालं होतं. तिनं तेजस देसाईबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. लग्नाच्या साडे चार वर्षांनंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत.