‘अलीबाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. आत्महत्येच्या तीन दिवसांनी तिच्यावर २७ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. तुनिषाने सेटवर शूटिंग सुरू असताना गळफास घेतला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानच्या मेक-अप रुममध्ये आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा शिझान सीन शूट करत होता. तुनिषाच्या आईने शिझानवर आरोप केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अशातच दुर्घटनेच्या दिवशी शिझान तुनिषाला रुग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये रुग्णालयाच्या बाहेरील दृश्य दिसत आहेत. ज्यामध्ये शिझान आणि काही लोक तुनिषाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेताना दिसत आहेत. रुग्णालयाबाहेरील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्वात आधी एक व्यक्ती रुग्णालयात धावत येताना दिसत आहे. मग एक कार दिसते. शिझान आणि इतर लोक तुनिषाचा मृतदेह कारमधून बाहेर काढतात. सर्वांनी मिळून तुनिषाचा मृतदेह धरल्याचं दिसतंय. त्यात शिझान मागे उभा असून त्याने तुनिषाचे पाय धरले आहेत. प्रत्येकजण खूप अस्वस्थ दिसत आहे. तुनिषाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेताना ते दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून तो तुनिषाचा रुग्णालयातील व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातंय.
या व्हिडीओमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुनिषा आणि शिझान दोघेही मालिकेतील त्यांच्या कॉस्च्युममध्ये दिसत आहेत. त्यामुळे तुनिषाने आत्महत्या केली, तेव्हा दोघांचं शूटिंग सुरू असल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यांनी पॅक अप केलं नव्हते आणि शूटिंगदरम्यानच तुनिषाने मेकअप रूममध्ये आत्महत्या केली.
दरम्यान, सध्या तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शिझान खान कोठडीत आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीनंतर शिझानला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.