Shilpa Shirodkar Car Accident :अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वत: माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या गाडीचा अपघात झाला असून याबाबत तिने पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात झाला असून तिच्या गाडीला एका बसने धडक दिल्याने हा अपघात घडून आल्याचं शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे. शिल्पाच्या चारचाकी गाडीला ठाण्यातील एका नामांकित कंपनीच्या बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. अभिनेत्रीने याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली, “आज सिटीफ्लोची एक (Cityflo) बस माझ्या गाडीला धडकली आणि त्यांच्या मुंबईतील ऑफिसचे प्रतिनिधी योगेश कदम आणि विलास मांकोटे सांगत आहेत की ही त्यांच्या कंपनीची जबाबदारी नाही, ती चालकाची जबाबदारी आहे. किती निर्दयी लोक आहेत हे. चालकाला असा किती पगार असेल!”

शिल्पा शिरोडकरने केली तक्रार

अभिनेत्रीने यावेळी मुंबई पोलिसांचे आभार मानत पुढे म्हटलं की, “धन्यवाद मुंबई पोलिस. तुम्ही मला यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात सहाय्य केलं. पण, त्या कंपनीने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सिटीफ्लो, तुम्ही जर या प्रकरणासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला तर त्याचं मी कौतुक करेन. सुदैवानं माझ्या स्टाफमधील कोणालाही दुखापत झाली नाही, पण काहीही होऊ शकलं असतं.” घडलेल्या प्रकरणात अभिनेत्रीला दुखापत झाली नसून ती सुखरुप आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही इतर फोटोंमधून ते कळतं.

शिल्पाने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या गाडीचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. तिच्या चारचाकी गाडीला बसने धडक दिल्याने गाडीच्या मागील बाजूस असलेल्या काचा फुटल्या आहेत. तिने सिटीफ्लो कंपनीच्या बसचा फोटोही पोस्ट केला असून यामध्ये त्या बसची नंबर प्लेटही दिसत आहे.

शिल्पा शिरोडकरची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, शिल्पा शिरोडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच बहुप्रतीक्षित थ्रिलर चित्रपट ‘जटाधरा’मधून झळकणार आहे. या चित्रपटातून शिल्पा शिरोडकर अनेक वर्षांनंतर मोठ्या पड्यावर पुनरागमन करणार आहे. ‘जटाधारा’ हा चित्रपट रहस्यमय अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या दडलेल्या गूढ परंपरेभोवती फिरतो, असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त ती एका अगामी वेब सीरिजचं चित्रीकरणही करत आहे.