Zee Marathi Shiva Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. ८ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. छोट्या पडद्यावर जवळपास दीड वर्षे अधिराज्य गाजवल्यावर आता ‘शिवा’ मालिका ऑफ एअर होणार आहे. आपल्या आवडत्या मालिका बंद होताना प्रेक्षक सुद्धा भावुक होतात. मात्र, मालिका संपल्याचं सर्वात जास्त दु:ख कलाकारांना होतं.

मालिकांचं शूटिंग जवळपास १२ तासांहून अधिक वेळ सुरू असतं. त्यामुळे मालिकेचा सेट हा कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतो. त्यामुळे मालिकेचा शेवट होताना सगळेच कलाकार भावुक होत असल्याचं पाहायला मिळतं. ‘शिवा’मध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक मुख्य भूमिका साकारत होती. यापूर्वी तिने बऱ्याच भूमिका साकारल्या होत्या पण, पूर्वाला ‘शिवा’मुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. त्यामुळे मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होताना तिने सोशल मीडियावर ‘शिवा’ या भूमिकेबद्दल पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.

पूर्वा कौशिक लिहिते, “एक पर्व संपलं. ८ ऑगस्टला म्हणजेच उद्या शिवा मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट होईल. सगळंच भरून आलंय…खूप काही दिलंस ग शिवा… प्रेम, आपलेपणा, हक्क, कणखर असणं खूप काही… कसा प्रवास सुरू झाला आणि आता शेवटच्या टप्प्यात आलोय आपण… ऑडिशन ते मालिका पूर्ण होईपर्यंतचा प्रवास खूप मोठा मजेशीर, कठीण, अनेक चढउतार असलेला, हिंमतीचा, संयमाचा होता. आता झोळी भरली आहे आठवणींनी…डोळे पाणावले आहेत पण, मनात एक फक्त एक भावना आहे ‘कृतज्ञता’!”

अभिनेत्री पूर्वा कौशिकचं भावनिक पत्र

प्रिय शिवा…

तुझं रोखठोक आणि निर्भीड असणं माझ्या अंगात आहे… पण तुझ्यासारखा आत्मविश्वास आणि संयम देखील माझ्यात असावा असं वाटतंय! माझ्या या २ वर्षाच्या काळात प्रत्येक सुख-दुःखात तू माझा आधार होतीस.. बऱ्याचदा रडू आलं तेव्हा-तेव्हा तू होतीस सोबत आणि माझं मन हलकं केलंस. राग, रडणं, हसणं, मस्ती करणं सगळं तुझ्या पुढ्यात केलं. हक्काने सोबत केलीस मला…एवढा संयम कसा काय आहे तुझ्यात मला प्रश्नच पडतो बुवा… पण Anyways या सगळ्यासाठी Thank you म्हणाले तर रागवशील मला माहितीय पण थोडी भीती वाटतेच आहे. जातेस ना तू, शिफ्ट होतेस म्हणे! असो हे असं बोलणं होत राहील But Thank You आणि I love you शिवा… या प्रवासात आपण एकत्र घडत होतो. कधी तू मला ओरडायचीस कधी मी तुला जवळ घ्यायचे… असे आपण एकत्र प्रवास करत आलो… तू होतीस म्हणून सगळ्या गोष्टी अंगावर घेऊ शकले. खूप काही शिकवून चालली आहेस म्हणूनही Thank You..!!!!!

या प्रवासादरम्यान बर्‍याच नवीन गोष्टींचा अनुभव मला घेता आला… माझ्यासाठी जणू हा प्रवास एका पर्वतारोहणासारखा होता. ( मोठा डोंगर चढण्यासारखा ), प्रत्येक Fighting Sequence एक नवीन आव्हान घेऊन यायचा. तुझ्या या धैर्याने मला खऱ्या अर्थाने ताकदीचा अर्थ म्हणजे काय हे समजलं. संकटांचा न घाबरता त्यांचा सामना करणं, म्हणजे धैर्य असणं.. हे वाक्य तुझ्यामुळेच मी बोलू शकले प्रत्येक मुलीच्या हृदयात असावं असं हे धैर्य होतं आणि आहे तुझ्यात..

अॅक्शन सीन शूट करताना माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे, पण प्रत्येक सीनमधून मी स्वतःला नव्याने शोधत गेले. या सगळ्याने मला माझ्या मर्यादांना ओलांडायला शिकवलं. प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाने ‘शिवा’ तुमच्या घराघरांत पोहोचली.. या कथेमुळे माझं तुमच्याशी एक अतुट नातं जोडल गेलं आहे. आणि हे नातं मी आयुष्भर जपून ठेवेन..!!

तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मनाच्या एका कोपर्‍यात ही भावना नक्की आहे की, हा शेवट नसून ही एका सुंदर प्रवासाची नवी सुरुवात आहे. मी आयुष्भर तुम्हा सगळ्यांची ऋणी राहीन…थँक्यू झी मराठी!

दरम्यान, पूर्वाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्याइतकी सुंदर शिवा तूच साकारु शकतेस” असं अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंतने कमेंट्समध्ये म्हटलं आहे. याशिवाय सृष्टी बाहेकर, ईशा संजय, वल्लरी विराज, अधोक्षज कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, आरती मोरे या सगळ्याच कलाकारांनी पूर्वावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.