Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab : श्रावण महिन्यातील पारंपरिक सणांचा गोडवा जपण्यासाठी आणि महिलांना मंगळागौर, पाककला स्पर्धा यांसारख्या विविध खेळांचा आनंद घेता यावा यासाठी ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमाचं मुंबईसह पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. १ ऑगस्टपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून ठाणे, दादर, वाशी, कल्याण अशा विविध भागात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता पुढील कार्यक्रमांचं नियोजन पुण्यात करण्यात आलं आहे.

‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. कल्याणमधील कार्यक्रमाला ‘कल्याणची चुलबुली’ अभिनेत्री शिवाली परब उपस्थित होती. यावेळी अभिनेत्री लोकसत्ताच्या प्रतिनिधीसह रॅपिड फायर राऊंड खेळली आणि शिवालीने सगळ्या प्रश्नांची एकदम दिलखुलासपणे उत्तरं दिली.

“तुझ्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती कोण? जी तुला श्रावणातील पावसासारखी वाटते” हा प्रश्न विचारताच शिवालीने तिच्या बहिणीचं स्नेहा परबचं नाव घेतलं. अभिनेत्री म्हणते, “श्रावणातील पावसासारखी माझी बहीण आहे. एकदम रिमझिम-रिमझिम… ती अशी मस्त बरसत असते. तिच्याकडून कमालीचा सुगंध येतो आणि माझ्यासाठी ती माझं प्रेरणास्थान आहे.”

पुढे, शिवालीला तिच्या छुप्या टॅलेंटबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणते, “लोकांना माझ्यातील सगळे कलागुण माहिती आहेत. हास्यजत्रेत त्यांनी सगळं पाहिलंय. पण, मला स्वत:ला माझ्यातील डान्स हे टॅलेंट खूप आवडतं. जे मी अजून म्हणालं तसं एक्सप्लोर केलेलं नाहीये.”

“सुंदर साडी नेसणं जास्त कठीण आहे की, साडी सावरणं?” यावर शिवाली म्हणते, “काहीच नाही मला साड्या नेसायला खूप आवडतात.” दरम्यान, अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.

लोकसत्ता श्रावणरंग पुढील कार्यक्रम

१२ ऑगस्ट – रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड स्टेशन रोड, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड – चेतना भट, रोहित माने

२० ऑगस्ट – पुण्याई सभागृह, बँक्वेट, १२७ – १ ए, पौड रोड, महागणेश कॉलनी, कोथरूड, पुणे – समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर