अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिने अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. तर सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये तिचं लग्न होणार असतानाच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
शिवानी आणि विराजसचा लग्न सोहळा चांगलाच चर्चेत होता. पुण्यामध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. तर नंतर त्यांनी लग्नाचं रिसेप्शनही ठेवलं होतं. संपूर्ण लग्नात शिवानीने एकच साडी नेसली होती, तर विराजसनेही कोणत्याही विधीसाठी कपडे न बदलता एकच शेरवानी परिधान केली होती.
आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना शिवानी म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यातील लग्नात मी अर्ध्या तासात तयार होऊन बाहेर आले होते. मी आधीच ठरवलं होतं की माझ्या लग्नामध्ये मला कोणत्याही विधीसाठी साड्या बदलायच्या नाहीयेत. सेटवर मी जशी पटकन तयार होते तसंच पटकन मला माझ्या लग्नातही तयार व्हायचं आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की, लग्नामध्ये लोक तुम्हाला भेटायला येतात, छान विधी सुरू असतात, घरच्यांशी, नातेवाईकांशी तुम्हाला बोलायचं असतं किंवा तो सगळा समारंभ तुम्हाला एन्जॉय करायचा असतो. नाहीतर नवरा-नवरी कपडे बदलण्यासाठी गेले ते दोन तास आलेच नाहीत आणि बाहेर सगळे जण त्यांची वाट बघत आहेत, हे मला आवडत नाही आणि मला स्वतःला त्याचा कंटाळही येतो.”
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये शिवानी ‘अक्षरा’ ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने मोठ्या काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या मालिकेचं आणि या मालिकेतील शिवानीच्या कामाचं सर्व जण भरभरून कौतुक करत आहेत.