Siddharth Jadhav on Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई, शशांक शेंडे,सिद्धार्थ जाधव हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकताच लोकमत फिल्मीबरोबर संवाद साधला. यावेळी त्याने महेश मांजरेकर आणि चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले. तो काय म्हणाला हे जाणून घेऊ…

भूमिकेबद्दल अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला…

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिनेता म्हणाला, “हे वर्षच खूप खास आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले याचं सगळं निमित्त हे महेश मांजरेकर सर आहेत. उत्तम सिनेमा, उत्तम विषय आहे. भव्य दिव्य सिनेमा, कटेंट, मनोरंजन, प्रबोधन असं सगळं काही या चित्रपटात आहे. यामध्ये माझी एक छोटी भूमिका आहे, याचा मला आनंद आहे.”

पुढे अभिनेता म्हणाला, “२३ ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसादिवशी चित्रपटाचं पोस्टर आलं होतं, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. माझ्या भूमिकेचं श्रेय हे महेश सरांना जातं. कारण-ते पात्र त्यांनीच डिझाइन केलं आहे. ते कसं असेल,काय असेल हे त्यांनी ठरवलेलं आहे. गोष्टीत काय होतं आणि इतर बाबी प्रेक्षक चित्रपटात पाहतील. पण, मी महेश सरांचे नेहमीच आभार मानतो. कारण-विनोदी काम तर मी नेहमीच करतो आणि कायमच करत राहणार.”

“विनोदाच्या पलीकडे जाऊन तू काम करू शकतोस, तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे. तू ते करू शकतोस, हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. मी फक्त पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाबाबत बोलत नाही. त्यांनी प्रत्येक भूमिकेबाबत त्यांनी हा विश्वास दाखवला.

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “‘कुटुंब’, ‘लालबाग परळ’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘दे धक्का’, या सगळ्या सिनेमांमध्ये मला विविध भूमिका दिल्या. मला खूप छान वाटतं. ते इतके दिग्गज आहेत. त्यांनी इतकी वर्षे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. मी काहीतरी करू शकतो, असं त्यांना नेहमीच वाटतं. ते माझ्यावर विश्वास टाकतात, तेव्हा जबाबदारी वाढते. पण, काम करायला मजा येते. हे पात्र साकारतानादेखील मजा आली.”

महेश मांजरेकर यांच्याबरोबरच्या बॉण्डिंगबाबत सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य

महेश मांजरेकर यांच्याबरोबरच्या बॉण्डिंगबाबत सिद्धार्थ म्हणाला, “ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही. मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. मला बरं वाटतं की फिल्ममेकिंग किंवा या क्षेत्रातील काही शिक्षण घेतलं नाही. आपण काम करत-करत शिकत आलो आहे. प्रत्येक चित्रपटाच्यावेळी ते मला मार्गदर्शन करत असतात.त्यातूनच मी शिकत असतो”, असे म्हणत त्याने महेश मांजरेकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.