Bigg Boss Marathi 5 मध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल प्रेक्षकांसहित कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. यामध्ये अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या सीझन ३ मध्ये सहभागी होणाऱ्या सुरेखा कुडची यांचादेखील समावेश होतो. आता एका मुलाखतीदरम्यान सुरेखा कुडचींनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या खेळावर वक्तव्य केले आहे. काय म्हणाल्या सुरेखा कुडची? सुरेखा कुडचींनी नुकतीच अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जान्हवी किल्लेकरमध्ये तुरुंगात गेल्यावरही काही बदल झाले नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले, "जान्हवी तिचा गेम चांगला खेळतेय, पण ती इतरांना ज्या पद्धतीने बोलते, खालच्या पातळीला जाऊन बोलते, त्यासाठी तिला तुरुंगात राहण्याची शिक्षा बिग बॉसने दिली होती. मात्र, आधी जे ती वर्षाताई आणि पॅडीबरोबर करायची, त्यांच्याशी जशी वागायची, तशी ती निक्कीबरोबर वागतेय. तिच्याशी त्या भाषेत बोलतेय, त्यामुळे तिच्यात बदल झालाच नाही. जान्हवी जेव्हा बोलत होती, त्यावेळी राग यासाठीच येत होता की तू कलाकार आहेस, मराठीमध्ये काम केले आहेस, तरीही ती वर्षाताई आणि पॅडीबरोबर तशी वागली." पुढे बोलताना त्या म्हणतात, "आमच्या सीझनमध्ये सोनाली आणि माझ्यामध्ये वाद होते. मात्र, कधीही सोनाली माझ्याशी या पातळीला जाऊन बोलली नाही. या सीझनमध्ये जसे काळ्या मनाची म्हटले गेले, पुरस्कारावरून बोलेले गेले, पण आमच्या संपूर्ण सीझनमध्ये कोणत्याही स्पर्धकाने इतर स्पर्धकाविरुद्ध असे शब्द वापरले नाहीत." नातेवाईकांवर याचा काय परिणाम होतो? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, "मानसिक स्थिती हलते" असे म्हटले आहे. हेही वाचा: विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…” याबरोबरच सुरेखा कुडची यांनी निक्कीच्या खेळाविषयी बोलताना म्हटले, "तिने याआधी बिग बॉसचा शो केला आहे, तिला माहीत आहे वर्षा उसगांवकर मोठे नाव आहे. त्यांना त्रास दिला तर आपण दिसू शकतो. ती मराठी इंडस्ट्रीचा भाग नाही, ती मला आपल्या संस्कृतीची वाटत नाही, तर तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार." दरम्यान, सुरेखा कुडची या बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी सोनाली पाटील आणि त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. जेव्हा जान्हवीने पंढरीनाथ कांबळेला जोकर म्हटले होते, त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली होती. आता बिग बॉस मराठी ५ च्या घरात पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.