Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जोरदार सुरू आहे. या पर्वात पहिल्या दिवसापासून हंगामा होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य पहिल्या दिवसापासून दमदार खेळताना दिसत आहेत. तसंच शनिवार, रविवार होणाऱ्या रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा टीआरपी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टॉप मराठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आहे. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला सध्या हे पर्व लवकरच गाशा गुंडाळणार असल्याची चर्चा सुरू आहेत.

बिग बॉस हा शो १०० दिवसांचा असतो. पण ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व ७० दिवसांत बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अंतिम फेरीची तारीख देखील व्हायरल झाली आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. यासंदर्भात अभिनेत्री सोनाली पाटीलने नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – “हे औदार्य महागात पडेल…”, पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंचा विरोध, थेट थिएटर मालकांना दिली ताकीद

अभिनेत्री सोनाली पाटील ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकली होती. पाचवं पर्व सुरू झाल्यापासून सोनाली ‘बिग बॉस मराठी’च्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बोलताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती ‘बिग बॉस मराठी’ ७० दिवसांत बंद होणार असल्यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करत आहे.

सोनाली पाटील म्हणाली, “माहिती नाही असं का वाटतं होतं…पण पहिल्यापासून असं होतं की, यावेळेसचं पर्व गाजायला पाहिजे. त्याप्रमाणे पर्व गाजलं. यात काही शंका नाही. पण बंद होण्याचं कारण अजिबात माहित नाहीये. जसं सगळीकडे बोललं जातंय की, ‘बिग बॉस’ लवकर बंद होणार आहे. पण एवढ्या लवकर का बंद करतायत माहित नाही. एवढा चांगला टीआरपी असताना…मला माहित आहे, काही गोष्टी घडल्या…आर्याच्याबाबतीत असतील…जेव्हा सगळ्या कुटुंबियाचं दाखवलं…त्याच्यात कोणी ना कोणीतरी बोललं. मला असं अपेक्षित होतं कोणीतरी घरात जाईल. प्रत्येक सदस्याच्या घरातल्या व्यक्तीने थेट भेटणं हा एक वेगळा अनुभव असतो. प्रेक्षकांसाठी देखील हा वेगळा अनुभव असता. पण तसं नव्हतं. थेट स्क्रीनवरती दाखवलं…का कोणास माहित नाही…एवढ्या लवकर ‘बिग बॉस मराठी’ बंद होतंय ही चांगली गोष्ट नाहीये. मला तर आवडलेलं नाहीये.”

हेही वाचा – श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यांत घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला, “अत्यंत वेदनादायी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, या आठवड्यात अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.