Spruha Joshi on Trolling: अभिनेत्री स्पृहा जोशी मालिका, नाटकांतील भूमिकांसाठी ओळखली जाते. तसेच तिने काही रिअॅलिटी शो, पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे.

याबरोबरच अभिनेत्रीच्या कवितादेखील लोकप्रिय आहेत. ती विविध माध्यमांतून या कविता सादर करत असते. स्पृहा व संकर्षणचा “संकर्षण व्हाया स्पृहा” हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. आता अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

“प्रत्येक गोष्टीला दोन बाजू …”

स्पृहा जोशीने नुकतीच बीबीसी मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने सोशल मीडिया, नकारात्मक कमेंट्स याबाबत वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत तिला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत विचारले. यावर स्पृहा म्हणाली, “ट्रोलिंग हे असतंच, मी अनेकदा हे बोलली आहे की सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तशा या नाण्यालादेखील आहेत. पब्लिसिटीचं हे सर्वात सोपं माध्यम आहे. आम्हीही ते हक्काने वापरतो.

“आमचे चित्रपट, नाटकांच्या प्रमोशनसाठी आम्ही ते माध्यम वापरतो. चांगली वाईट माणसं सगळीकडे भरलेली आहेत. सोशल मीडियावर तर असं आहे की एखाद्याच्या समोर येऊन आपण त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही, तेवढी हिंमत नसते, तिथे ते उत्तरदायित्व नसते. कोणीही कुठल्याही नावाने सोशल मीडियावर अकाउंट उघडू शकते. कोणी कोणाला समोरासमोर दिसत नाही. रिकामा वेळ असल्यानंतर कमेंट करतात, एखादी गोष्ट आवडली नाही की घाण कमेंट करा, असं लोक करतात. “

“कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की…”

“सोशल मीडियावर असा कोणीही विचार करत नाही की आपण अमुक गोष्टी लिहिल्यामुळे समोरच्याला काहीतरी त्रास होऊ शकतो. या मानसिकतेने कित्येक लोक असं करतात. मात्र, यापासून पळणार कुठे? नाहीतर संन्यासच घ्यायला लागेल, ते तर शक्य नाही. मी माझ्या परीने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. अनेकदा अशा गोष्टी लक्ष वेधून घेण्यासाठीदेखील केल्या जातात. कुठल्याही कमेंटला उत्तर दिलं की नवीन चर्चा सुरू होते. त्याचा मूळ पोस्ट किंवा वाक्याशी काहीही संबंध असत नाही. अनेकदा क्लिटबीटमुळेदेखील चर्चा सुरू होतात. एखाद्या अभिनेत्रीने, अभिनेत्याने एक पोस्ट केलेली असते, ती घेतात आणि त्यांच्या सोशल मीडियावर टाकतात. त्याला कॅप्शन वेगळी देतात, कारण क्लिकबीटचा अर्थ तोच आहे की लोकांनी पटकन उघडून बघतील. मग त्याची जबाबदारी कोणाची आहे? त्यावरून जे नवीन ट्रोलिंग चालू होतं, त्याची जबाबदारी कोणाची? तिथे कुठे मग त्या कलाकारांच्या मनाचा विचार केला जातो? किती ठिकाणी तुम्ही लोकांना नियंत्रित करणार?”

पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, “मोठ्या मुलाखती पाहण्याचा संयम लोकांमध्ये नसतो. मग तेवढंच एखादं रील पाहून कमेंट करायच्या. त्याच्या मागे-पुढे ती व्यक्ती काय बोलली आहे, याचा जराही विचार करायचा नाही. मग ते चक्र सुरूच होतं. याचा अर्थ सोशल मीडिया वापरणारे सगळे लोक वाईट आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण, जे लोक वाईट आहेत त्यांना हे माहीत आहे की आपल्याला इथे कोण विचारणार आहे? माझ्याबद्दल कोणी काही बोललं की ट्रोलिंग केलं तर मी कोणाला विचारू शकणार आहे? माझ्याबद्दल असं का बोललास किंवा माझ्याबद्दल असं लिहिलंस, असं मी कोणाला विचारू शकणार नाही. हे मी करू शकणार नाही. ते करत राहिले तर मी माझं काम कधी करू? तितकी ऊर्जा माझ्याकडे नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणजे तुम्ही याकडे दुर्लक्ष करू शकता.”

नकारात्मक कमेंट्सला ती कशी सामोरी जाते, यावर स्पृहा म्हणाली, “मी कुठल्याही निगेटिव्ह कमेंट्सला उत्तर द्यायच्या भानगडीत पडत नाही. मी मला जे वाटतंय त्याबद्दल पोस्ट करते. तुम्हाला त्यावर चांगलं बोलायचं असेल तर आनंद आहे. अनेक सुंदर गोष्टी सोशल मीडियामुळे घडत आहेत. अनेक चांगली माणसं जोडली जात आहेत. सोशल मीडिया नसतं तर त्यांना कदाचित मी भेटू शकले नसते, त्यामुळे अशा नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करते”, असे म्हणत अभिनेत्रीने चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत, ती सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करते असे वक्तव्य केले.