सध्या ऐतिहासिक भूमिका करणाऱ्या कलाकरांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे त्याचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित होताच ट्रोल करण्यात आलं. ऐतिहासिक भूमिकांच्याबाबतीत आता स्पृहा जोशीने आपले मत मांडले आहे.

छोट्या पडद्यावरील स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमात भूमिका साकारल्या आहेत. ‘लोकमान्य’ या तिच्या नव्या मालिकेच्या कार्यक्रमात तिला जेव्हा पत्रकाराने विचारले की सध्या ऐतिहासिक भूमिकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, त्यामुळे ही भूमिका करताना दडपण होत का?” त्यावर स्पृहा म्हणाली, “मला वाटतं सोशल मीडियामुळे बऱ्याचदा वातावरण प्रदूषित होत असतं. हे खरं आहे की सोशल मीडिया तितके वाईट नसते. आपल्या आजूबाजूला सोशल मीडियाचा राक्षस आहे, त्यामध्ये काही चांगल्या प्रवृत्ती आहेत तशा वाईट प्रवृत्तीदेखील आहेत. आणि त्याला घाबरून कलाकारांनी काम करण्यास बंद केलं तर कोणतेच विषय मांडता येणार नाहीत. चांगला विषय चांगल्या पद्धतीने मांडला पाहिजे, उगाचच कोणताही वाद आपण सुरु करू नये.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा मालिकेतून मांडण्यात येणार आहे. टिळकांचा प्रभावी इतिहास या मालिकेतून छोट्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत क्षितीज दाते आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. दशमी क्रिएशन्स’ने मालिकेची निर्मिती केली असून स्वप्निल वारके यांनी दिग्दर्शन केले आहे. ही मालिका आता बुधवार-शनिवार रात्री ९:३० वाजता झी वाहिनीवर पाहता येणार आहे.