Star Pravah Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १५ सप्टेंबरपासून महत्त्वाचा बदल होणार आहे. वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. रुपाली भोसलेची प्रमुख भूमिका असलेली ‘लपंडाव’ मालिका दुपारी २ वाजता प्रसारित केली जाईल. तर, आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेली मल्टिस्टारर ‘नशीबवान’ मालिका रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू होणार म्हटल्यावर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा शेवटचा भाग १२ सप्टेंबरला प्रसारित होणार आहे. शिवानीने स्वत: भावनिक पोस्ट शेअर करत सेटवर शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडल्याचं सांगितलं होतं. याशिवाय या मालिकेतील अन्य कलाकारांनी सुद्धा भावुक पोस्ट शेअर करत मालिकेचा शेवट झाल्याचं सांगितलं आहे.
आता शिवानी सुर्वेच्या मालिकेपाठोपाठ आणखी एक लोकप्रिय सिरियल ऑफ एअर होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका अवघ्या ९ महिन्यांत सर्वांचा निरोप घेणार आहे. २ डिसेंबर २०२४ रोजी याचा पहिला भाग प्रसारित झाला होता. पहिल्याच आठवड्यात या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला होता. आता ही मालिका सर्वांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत.
‘या’ मालिकेची वेळ बदलली
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जाते. या वेळेला आता १५ सप्टेंबरपासून आकाश-भूमीची ‘शुभविवाह’ ही मालिका प्रक्षेपित केली जाईल. तर, २ वाजता ‘लपंडाव’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत – ऑफ एअर
शुभविवाह – आता नव्या वेळेत दुपारी २:३० वाजता
लपंडाव – नवीन मालिका दुपारी २ वाजता
हे महत्त्वाचे बदल वाहिनीवर येत्या १५ सप्टेंबरपासून होणार आहेत. आता ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.