Star Pravah New Serial Halad Rusali Kunku Hasala : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. टीआरपीमध्ये अग्रेसर राहण्यासाठी सध्या मराठी टेलिव्हिजन वाहिन्यांमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जुन्या मालिका बंद होऊन आता येत्या काळात नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर सुरू होणार आहेत.
‘स्टार प्रवाह’ने टीआरपीच्या शर्यतीमधलं आपलं पहिलं स्थान टिकवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. ‘स्टार प्रवाह’ने नुकताच नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. ही मालिका जरी नवीन असली तरी यात मुख्य भूमिकेत झळकणारे कलाकार मात्र जुने असणार आहेत.
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. समृद्धीच्या मालिकेने २०२२ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, मालिका संपून जवळपास दोन-अडीच वर्षे उलटली असली तरी आजही समृद्धीची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. आपली आवडती अभिनेत्री नव्या मालिकेतून कमबॅक करणार असल्याने सध्या समृद्धीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
समृद्धीच्या नव्या मालिकेचं नाव आहे ‘हळद रुसली, कुंकू हसलं’. यामध्ये तिच्यासह अभिनेता अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिषेकने यापूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना समृद्धी आणि अभिषेकची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.
“ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी…येत आहेत भेटायला” असं कॅप्शन देत ‘स्टार प्रवाह’ने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये समृद्धी तिच्या गायीला दवाखान्यात नेत असते. इतक्यात रस्त्यात तिला या मालिकेचा नायक भेटतो. दोघांमध्ये गाडी मागे घेण्यावरून वाद होतो आणि शेवटी गायीच्या काळजीपोटी समृद्धी दमदाटी करून शहरातून गावाकडे आलेल्या नायकाला गाडी मागे घ्यायला लावते असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, वाहिनीने अद्याप या मालिकेच्या प्रसारणाची वेळ जाहीर केलेली नाही. या नव्या मालिकेसाठी आणि समृद्धी-अभिषेकला ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. सुमीत पुसावळे, स्वरदा ठिगळे, शर्वरी जोग, अपूर्वा नेमळेकर, दिव्या पुगांवकर, शरयू सोनावणे, गिरीजा प्रभू या कलाकारांनी प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.