KajalMaya Fame Ruchi Jail Talks About Her Parents : मराठी टेलिव्हिजनवर सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका पाहायला मिळत आहेत. अशातच लवकरच ‘काजळमाया’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये मराठीतील लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. अशातच आता यातील अभिनेत्री रुची जाईलने या मालिकेबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.

‘काजळमाया’ मालिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, अक्षय केळकर, रुची जाईल, प्रिया बेर्डे यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत. रुची यामध्ये चेटकिणीच्या रूपात दिसणार आहे. अशातच आता तिने या मालिकेबद्दल तिच्या आई-वडिलांची व तिची काय प्रतिक्रिया होती याबद्दल माहिती दिली आहे.

रुची जाईलची प्रतिक्रिया

रुचीनं ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. रुची त्याबद्दल म्हणाली, “मी सध्या नि:शब्द आहे. कारण- लहानपणापासून मला हेच करायचं होतं आणि जेव्हा तुमचं स्वप्न खरं होतं असतं तेव्हा तुमच्याकडे काही शब्दच नसतात. पण, मी खूप आनंदी आहे. आभारी आहे की, मला इतकी छान भूमिका मिळाली आहे.”

रुचीला पुढे ही मालिका तिली कशी मिळाली याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला अभिनेत्री व्हायचंच होतं. त्यामुळे ऑडिशन वगैरे सुरू होतं. मी तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भाग घेतला होता आणि त्यात मी विजेती झाली होती. तेव्हा मी मुंबईला त्यानिमित्त गेले होते. तिथे सतीश राजवाडे सर होते आणि तिथे मी एक स्कीट केलं होतं. त्यातील माझा लूक त्यांना आवडला होता. मग मला चॅनेलकडून फोन आला होता की, अशी अशी ऑडिशन आहे. तुला द्यायची आहे का. मी ती ऑडिशन दिली आणि मला दुसऱ्या दिवशी निर्मात्या शर्मिष्ठा मॅमचा कॉल आला आणि त्या म्हणाल्या की, रुची आम्ही तुझी निवड केली आहे. त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. स्वप्नवत वाटत होतं.”

आई-बाबा ढसाढसा रडले – रुची जाईल

रुची पुढे आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल म्हणाली, “पहिला प्रोमो आला तेव्हा मी आई-वडिलांबरोबर नव्हते. कारण- मी शूट करीत होते आणि ते पुण्यात होते. पण, पहिल्यांदा जेव्हा मी स्वत:ला स्क्रीनवर पाहिलं तेव्हा मी, आणि आई-बाबा आम्ही रडलो. खूप रडलो. कारण- इतकी वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं, ते घडत होतं. त्यामुळे रडणं थांबतच नव्हतं. पण, त्यांना खूप अभिमान आहे आणि मी त्यांना अभिमान वाटेल असंच काम करीत राहणार आहे.”