Marathi Actor Gandhar Kharpudikar New Home : आपलं हक्काचं घर, हक्काची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांची स्वप्नपूर्ती झाली. कुणी नवीन गाडी खरेदी केली, तर कुणी नव्या घरात गृहप्रवेश केला. अनुजा साठे, प्रियांका तेंडोलकर यांच्यापाठोपाठ मराठी टेलिव्हिजनविश्वात सक्रिय असणाऱ्या आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांबरोबर नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे.
विविध मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता गंधार खरपुडीकरने दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी केल्याची गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्याच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. गंधारने त्याचं हे नवीन घर पुण्यात खरेदी केलं आहे.
नव्या घराचे फोटो शेअर करत अभिनेत्याने या फोटोंना ‘स्वप्नपूर्ती- नवीन घर, नवा आनंद’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या पोस्टवर ‘नवीन घर’, ‘आपलं पुणे’ असे हॅशटॅग अभिनेत्याने दिले आहेत.
गंधारबद्दल सांगायचं झालं तर, ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रियता मिळाली. त्याने या मालिकेत वृषभ रत्नपारखी ही भूमिका साकारली होती. याचबरोबर ‘समांतर’, ‘बावरा दिल’ अशा कलाकृतींमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
गंधारने नव्या घराच्या प्रवेशद्वारावर खूपच खास नेमप्लेट लावली आहे. या नेप्लेटवर ‘४०२ खरपुडीकर’ असं नाव लिहिण्यात आलं आहे. तर, गंधारने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्या नव्या घरात विधिवत पूजा पार पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
