Lapandav Fame Chetan Vadnere Talks About Krutika Deo : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘स्टार प्रवाह’वरील ‘लपंडाव’ ही मालिका. त्यामध्ये अभिनेता चेतन वडनेरे व कृतिका देव हे दोघे मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या मालिकेत सखीच्या स्वयंवराचा भाग पाहायला मिळत आहे. अशातच आता याबद्दल चेतन व कृतिका यांनी सांगितलं आहे.
कृतिका व चेतन या मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्यांच्याबरोबर यामध्ये अभिनेत्री रूपाली भोसलेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ‘लपंडाव’मध्ये सध्या सखीचा स्वयंवराचा भाग सुरू असून, तो सखीला हवा त्यानुसारच पार पडत असल्याचं दिसतं. यावेळी तिनं स्वयंवरात सहभागी झालेल्या मुलांची परीक्षा घेण्यासाठी विविध गोष्टी ठरवल्या आहेत. तिनं व चेतननं नुकतंच ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल तसेच खऱ्या आयुष्यात त्यांचे लग्नाबद्दल काय विचार होते याबद्दल सांगितलं आहे.
कृतिका देवबद्दल चेतन वडनेरेची प्रतिक्रिया
मुलाखतीत कृतिका व चेतन यांनी मालिकेत सुरू असलेल्या सध्याच्या ट्रॅकबद्दल सांगितलं आहे. त्यामधून त्यांनी मालिकेत पुढे स्वयंवराच्या भागात अजून रंजक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांना “खऱ्या आयुष्यात लग्न करताना तुम्ही काय विचार केला होता का, काही ठरवलं होतं का?” याबद्दल विचारलं असताना यावर कृतिका म्हणाली, “लग्नासंदर्भात माझे असे काहीही वेगळे विचार नव्हते.” त्यावर चेतन गमतीत म्हणाला, “तिनं लग्नच लहानपणी केलंय”. त्यावर कृतिका हसत म्हणाली, “हो, तो म्हणाला ते बरोबर आहे. पण, माझं लग्नाबद्दल कुठलंही असं वेगळं स्वप्न नव्हतं.”
चेतनने पुढे लहानपणी लग्नाबद्दल त्यानं काही स्वप्नं पाहिलेली का, त्याच्या त्याबद्दल काही कल्पना होत्या का याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता याबद्दल म्हणाला, “मी पत्र पाठवली जातात तसा बॉक्स खरेदी करणार होतो आणि आईला मी म्हणालेलो की, लग्नासाठी मी स्थळं त्यावर मागवेन. ज्यांना माझ्याशी लग्न करण्यात रस आहे, त्यांनी त्या पीओ बॉक्समार्फत स्थळं पाठवावी.” त्यावर कृतिका म्हणाली, “म्हणजे स्वयंवर असतं तसंच करायचं होतं तुला”. चेतन पुढे म्हणाला, “हो; पण लहानपणी. नंतर मला अक्कल आली आणि कळलं की नाही, असं नसतं”.
दरम्यान, कृतिका देव व चेतन वडनेरे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. आजवर त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. दोघांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांबद्दल बोलायचं झालं, तर कृतिकानं अभिनेता अभिषेक देशमुखबरोबर काही वर्षांपूर्वीच लग्न केलंय, तर चेतननं अभिनेत्री रुजुता धारपबरोबर २०२४ मध्ये लग्न केलं.