Star Pravah Nashibvan Serial Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १५ सप्टेंबरपासून ‘नशीबवान’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो लॉन्च करण्यात आला होता. यामध्ये मुख्य नायिका आणि खलनायकाची झलक पाहायला मिळाली. मात्र, ‘नशीबवान’मध्ये मुख्य नायक/अभिनेता म्हणून कोण झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नुकताच एक पाठमोरा व्हिडीओ शेअर करत वाहिनीने या अभिनेत्याची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नायकाच्या हातात उकडीचा मोदक असल्याचं पाहायला मिळतंय. पण, या व्हिडीओमध्ये हिरोचा चेहरा रिव्हिल करण्यात आलेला नाही. यावर “तुम्हाला भेटायला येतायत ‘रुद्र प्रताप घोरपडे’….” असं कॅप्शन दिलं आहे. यावरून मुख्य अभिनेता साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव ‘रुद्र प्रताप घोरपडे’ आहे असं स्पष्ट होत आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून आदिनाथ कोठारे आहे असा अंदाज व्यक्त केला आहे. कारण, आदिनाथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोठारे व्हिजन्सच्या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये तुम्हाल खूप मोठं सरप्राइज मिळेल असं आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे हा आदिनाथ असल्याचं बोललं जात आहे. तर, काही नेटकऱ्यांनी हा अभिनेता राज हंचनाळे, सुयश टिळक यांच्यापैकी कोणीतरी असेल असा अंदाज वर्तवला आहे. आता हा अभिनेता नेमका कोण आहे हे गुपित मालिकेचा संपूर्ण प्रोमो प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांसमोर येणार आहे.
दरम्यान, ‘नशीबवान’मध्ये प्रेक्षकांना गिरीजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळेल. याच गिरीजाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री नेहा नाईक साकारणार आहे. तर, प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे सुद्धा या मालिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने १० वर्षांनी ती टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे. या मालिकेत सोनाली खलनायिकेची उर्वशी ही भूमिका साकारेल. ही मालिका १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाईल.