‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘शिट्टी वाजली रे’ हा नवीन शो सुरू होणार आहे. हा रिअ‍ॅलिटी शो नेहमीपेक्षा खूपच आगळावेगळा असणार आहे. कारण, या कार्यक्रमात कलाकारांना नवनवीन पदार्थ बनवण्याचा टास्क देण्यात येणार आहे. मात्र, हे पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. कलाकार विविध मालिका व सिनेमांमधून नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. पण, आता प्रेक्षकांना त्यांचे लाडके कलाकार स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसतील.

अभिनयाने मन जिंकणारे हे कलाकार स्वयंपाक करण्यात खरंच हुशार आहेत का? याची पोलखोल ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात होणार आहे. स्वयंपाक करता-करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध या कार्यक्रमाद्वारे घेण्यात येणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून, ‘पूर्णब्रह्म’ या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.

या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय वाघ म्हणाला, “शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर मी छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. ‘स्टार प्रवाह’बरोबर जवळपास १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहच्या सुरुवातीच्या काळात मी, ‘गोष्ट एका जप्तीची’ नावाच्या मालिकेत काम केलं होतं. मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. त्यामुळे ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमासाठी विचारणा झाली तेव्हा तातडीने होकार दिला.”

“मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता मात्र, लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक करायला शिकलो. तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कुणी विश्वास ठेवणार नाही मात्र, मी आता नियमित स्वयंपाक बनवतो. यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला समजली ती म्हणजे आपली आई, मावशी, काकू, बहिण, पत्नी कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, घरासाठी राबतात त्यांचं किती कष्टाचं काम आहे याची जाणीव मला झाली. ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात अनेक कलाकार सामील होणार आहेत. त्यांच्यासह या मंचावर धमाल-मस्ती अनुभवता येणार आहे. मी या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे” अशी भावना अमेय वाघने व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’ या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोटभर हसायचं असेल तर ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचा एकही भाग पाहायला चुकवू नका. २६ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.