Star Pravah Shitti Vajali Re Show : स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या कार्यक्रमाचं नाव म्हणजे ‘शिट्टी वाजली रे.’ अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात गौतमी पाटील, धनंजय पोवार, घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, विनायक माळी हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. तसंच मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या बहिणीही सहभागी आहेत. तसंच आठवड्याच्या प्रत्येक नवीन भागात वाहिनीचे काही कलाकारही येत असतात.
या कार्यक्रमात शेफ जयंती कठाळे परीक्षकेच्या भूमिकेत आहेत, तर अभिनेता अमेय वाघ हा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. अमेय त्याच्या खास अंदाजात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे आणि अनेक प्रेक्षकांच्या ते पसंतीसही पडत आहे. अशातच कार्यक्रमाच्या आगामी भागात त्याचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी भागाचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात तो स्पर्धकांवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाच्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये ‘अबोली’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे काही कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘अबोली’ मालिकेतील अबोली म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर यांच्यातील झटापटीत अबोलीच्या हातातलं ताट खाली पडतं, तेव्हा अमेय त्यांना रागाने “हे असं अन्न सांडणं बरोबर नाही”, असं म्हणतो.
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रम प्रोमो
यानंतर अंकुश (सचित पाटील) “त्यांच्यामुळे अन्न सांडलं आहे; आम्हाला पाच स्टार द्या” असं म्हणतो, तर निक्कीसुद्धा रागाने “आम्ही केलेली मेहनत वाया गेली का?” असं म्हणते. यानंतर अमेय “अन्न सांडलं हे होणं अपेक्षित नव्हतं” असं म्हणतो. यादरम्यान ‘अबोली’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही टीममधील स्पर्धकांमध्ये बाचाबाची होते. ही बाचाबाची ऐकून अमेय चिडून “अरे बस्स यार, कोणीतरी ऐका ना! हा भांडणाचा शो आहे का?” असं म्हणतो.
‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेचा भांडणाचा प्रोमो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे; कारण कार्यक्रमात भांडण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हसत-खेळत पदार्थ बनवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्यांदाच भांडण पाहायला मिळाल्याने अनेकांनी हा प्रॅन्क असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, हा प्रॅन्क आहे की खरंच असं काही घडलं आहे, हे येत्या भागात पाहायला मिळेल.