Star Pravah Serial TRP Updates: दररोज प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या मालिकांचा टीआरपी किती आहे, हे माहीत असणे त्या त्या वाहिनीसाठी महत्त्वाचे असते. टीआरपीवरून कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा सर्वांत जास्त प्रतिसाद मिळत आहे, कोणत्या मालिकेला कमी प्रतिसाद मिळत आहे, हे समजत असते.
टीआरपीच्या दृष्टिकोनातून काही बदल केले जातात. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी किती आहे? कोणत्या मालिकेने पहिल्या स्थानी बाजी मारली आहे? तसेच कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या महिन्यांत स्टार प्रवाह वाहिनीवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘लपंडाव’ व ‘नशीबवान’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकांना किती टीआरपी मिळाला आहे, हे जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ मालिका TRP मध्ये अव्वल
‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. ४.३ या रेटिंगसह ही मालिका पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. या मालिकेला ४.२ रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. ऐश्वर्याचे सत्य समोर आणण्यासाठी जानकी व रणदिवे कुटुंबाने अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश मिळाल्याचेही पाहायला मिळाले. तिचे हृषिकेशबरोबरचे लग्न मोडले आणि कोर्टात केस दाखल झाली. आता तिथे शिक्षा मिळू नये म्हणून ऐश्वर्या पुन्हा कट-कारस्थान करीत असल्याचे दिसत आहे.
३.६ या रेटिंगसह ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेतदेखील विविध घटना घडताना दिसत आहेत. चौथ्या स्थानावर ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आहे. या मालिकेला ३.४ रेटिंग मिळाले आहेत. तर, पाचव्या स्थानावर ३.४ या रेटिंगसह ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका आहे.
सहाव्या स्थानावर नशीबवान, सातव्या स्थानावर लक्ष्मीच्या पाऊलांनी, आठव्या स्थानावर येड लागलं प्रेमाचं, नवव्या स्थानावर आता होऊ दे धिंगाणा, दहाव्या स्थानावर साधी माणसं, अकराव्या स्थानावर मुरांबा, बाराव्या स्थानावर लपंडाव, तेराव्या स्थानावर अबोली, चौदाव्या स्थानावर शुभविवाह, तर सगळ्यात शेवटी हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आहे.
सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या नशीबवान या मालिकेला ३.२ रेटिंग मिळाले आहे. ही मालिका सहाव्या स्थानावर आहे; तर १.९ या रेटिंगसह लपंडाव ही मालिका १२ व्या स्थानावर आहे. दरम्यान, आता पुढील आठवड्यात टीआरपी चार्टमध्ये काय बदल होणार, कोणती मालिका वरच्या स्थानावर जाणार, कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.